मोठी बातमी ! सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली (File Photo : Blast)
मुंबई : मुंबईतील वांद्रे येथे एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली. यामध्ये मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही चाळ कोसळल्याने या ढिगाऱ्याखाली 14-15 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे.
चाळ क्रमांक 37 शुक्रवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास कोसळली. अग्निशमन विभागाच्या एका, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक यंत्रणेसह आठ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरात चाळीचा काही भाग कोसळल्याने अनेक जण जखमी झाले असून, काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे, अशी माहिती वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरातील अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, चाळ कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथक आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ बचावकार्य सुरू केले असून, आतापर्यंत 10 जणांना मलब्याखालून काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या भाभा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मलब्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती व्यक्ती करण्यात येत आहे. बचाव पथकाकडून मदतकार्य वेगात सुरू करण्यात येत आहे.
12 जणांना रुग्णालयात केलं दाखल
आतापर्यंत ढिगाऱ्यातून काढलेल्या 12 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 7:50 च्या सुमारास घडली. प्राथमिक तपासात असे समजले आहे की, इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला, त्यानंतर इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. अग्निशमन विभाग, मुंबई पोलीस आणि बीएमसी यांच्याकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.