विधानसभा लॉबीमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
CM Devendra Fadnavis : मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या आवारामध्ये पहिल्यांदाच मारहाण झाल्याचे दिसून आले आहे. विधीमंडळाच्या लॉबीमध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मारामारी झाली. या प्रकारावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या मारहाणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेच्या आवारामध्ये झालेल्या मारामारीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कडक कारवाई करण्याची विनंती केली असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. काल (दि.17) झालेल्या या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळामध्ये देखील उमटत आहेत. सभागृहामध्ये या मारहाणीची माहिती देण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. या संदर्भात जी योग्य आणि कडक कारवाई असेल ती करावी. अशा प्रकारची विनंती मी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा होतात आणि मारहाण करतात हे विधानसभेला शोभणारे नाही. यामुळे या प्रकरणावर निश्चित कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहाच्या अध्यक्षांकडे केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दोषींवर फौजदारी कारवाई करणार
या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधीमंडळामध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मी मागवला आहे. हा अहवाल एकदा आला की मी यावर पुढची भूमिका स्पष्ट करेल. जोपर्यंत या प्रकरणाचा अहवाल येत नाही तोपर्यंत मी यावर जास्त बोलणार नाही. आज दुपारी दीड वाजता या प्रकरणावर काय शिक्षा दिली जाईल हे सांगेन. अहवाल आल्यानंतर दोषींवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. माझ्याकडे जे अधिकार आहेत त्या स्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल,” अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे.