BJP MLA Sanjay Upadhyay claims that beef will be available in Mumbai due to Gudi Padwa
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी खडाजंगी देखील सुरु आहे. प्रशांत कोरटकर, दिशा सालियान आणि औरंगजेब कबर अशा अनेक प्रकरणावरुन विधीमंडळाचे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी आता गुढीपाडव्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस येण्याची शक्यता असल्याचा मोठा दावा केला आहे. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
भाजप नेते व आमदार संजय उपाध्याय यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईमध्ये धार्मिक स्थळांचे अतिक्रमण वाढले असल्याचे सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. ते म्हणाले की, “सरकारी जमिनीवर धार्मिक स्थळांचे अतिक्रमण वाढले आहे. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे 2006 साली एक मजार बांधण्यात आली. जवळ 200 स्क्वेअर फूटची मजार आता 32 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरली आहे. यामध्ये 14 दुकानं, लग्नाचा हॉल, मैदान आणि विशेष म्हणजे मजार ही जमिनीवर असते ही मजार तिसऱ्या मजल्यावर आहे,” असा गंभीर आरोप संजय उपाध्याय यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप आमदार संजय उपाध्याय म्हणाले की, “याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. मात्र सरकारी अधिकारी हे दिरंगाई करत आहेत. कोर्टाचा आदेश असून देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अंबूजवाडी मलाड येथे मंगलप्रभात लोढा यांनी अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मात्र त्यांच्या विरोधात मेधा पाटकर यांनी हाय कोर्टामध्ये तक्रार दाखल केली. हे लोक सरकारी जागेवरच अतिक्रमण हटवल्यानंतर मंत्र्यांवर कारवाई करतात,” अशी तक्रार सत्ताधारी आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे.
आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबईमध्ये गोमांस मोठ्या प्रमाणात येणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य देखील केले आहे. ते म्हणाले की, “मुंबईला मोठा धोका आहे. नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दुकानामधून गोमांस हे ट्रकमध्ये लोड केले जात होते. आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र पोलिसांमध्ये कोणाच्या हद्दीमध्ये हे प्रकरण सुरु आहे यावर चर्चा सुरु होती. यामध्येच तीन तास पोलिसांच्या हद्दीवरुन वाद होऊन कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती, असा आरोप संजय उपाध्याय यांनी केला. याचबरोबर येत्या रविवारी हिंदूनववर्षे अर्थात गुढीपाडव्याचा सण आहे. दुसऱ्या दिवशी ईद आहे. यामुळे मुंबईमध्ये 30 तारखेला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस येण्याची शक्यता आहे,” असा गंभीर दावा संजय उपाध्याय यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते म्हणाले की, “गुढीपाडवा आणि ईद असल्यामुळे मुंबईमध्ये गोमांस येण्याची शक्यता आहे. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगितले आहे. पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. अशी कोणतीही सूचना येताच तात्काळ कारवाई केली पाहिजे. या राज्यात संपूर्ण गोवंशहत्या बंदी आहे. त्यानंतर सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने गोवंश हत्या केली जात आहे तर त्याला जे प्रोत्साहन आणि समर्थन देत आहेत. तसेच जे पोलीस अधिकारी कारवाई करण्यास दिरंगाई करत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे.