
BJP Pankaja Munde handed over Parli constituency to Dhananjay Munde Beed Political News
Pankaja Munde on Parli : बीड : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) होत असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी निकाल हाती येणार आहे. 29 पालिकांसाठी निवडणूका होत असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईसह सर्व महत्त्वाच्या पालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली आहे. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या देखील जोरदार प्रचार करत असून त्यांनी परळीबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यावर सत्ता कायम राखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. पंकजा मुंडे यांचे बंधू असलेले धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे बीडचे राजकारण हे अनेकदा तापलेले असायचे. मात्र यानंतर धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केल्यामुळे मुंडे भाऊ-बहीण एकत्र आले. अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे मुंडे भावंडाची युती झाली. त्यामुळे सर्व निवडणूका या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित लढल्या. मात्र यानंतर धनंजय मुंडे यांना मिळालेले मंत्रिपद हे त्यांना सोडावे लागले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
हे देखील वाचा : नारायण राणेंनी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन दिली जीवे मारण्याची धकमी; बाळासाहेबांनी बोलावलं अन्…
मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी मात्र परळीबाबत पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी भाजपचा अभेदय गड राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली… आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात… मी परळी इतकेच माळाकोळीवर प्रेम करते. मी आता माळाकोळी सांभाळणार.. परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या… मी त्यांना परळी देऊन टाकली. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या, असे सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरु झाल्या आहेत.
हे देखील वाचा : जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर
पुढे त्या म्हणाल्या की, मी त्यांना म्हटले तुमचा मतदार संघ आहे तुम्ही प्रेम करा. मी आता माळाकोळीवर प्रेम करते. पंकजा मुंडे यांनी एकप्रकारे अत्यंत मोठे संकेत देऊन टाकले आहेत. माळाकोळीवर गोपीनाथ मुंडे यांचे विशेष प्रेम होते. आता पंकजा मुंडे यांनी माळाकोळीबद्दल मोठे विधान केले. यामुळे नवीन राजकीय समीकरणे बघायला आगामी काळात मिळू शकतात.