
BMC elections Mahayuti making political BJP holds a press conference NCP out
BMC Elections : नवी मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्याची राजाधानी आणि अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई पालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले आहेत. महायुतीची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. मात्र यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाव घेणे टाळण्यात आले. त्यामुळे मुंबईसाठी राष्ट्रवादीला आऊट करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत.
मुंबईमध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनीएकत्रित पत्रकार परिषद घेतली. तसेच दोन्ही पक्षांमध्ये 227 पैकी 150 जागांवर एकमत झाले असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली.
हे देखील वाचा : “धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं तर…; अमित शाहांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी
भाजप नेते अमित साटम म्हणाले की, “मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी १५० जागांवर भाजप अन् शिवसेनेचे एकमत झालं आहे. उर्वरित १० जागांवर पुढच्या दोन दिवसांत चर्चा करून घोषणा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे. ही मुंबईकराची इच्छा आहे. त्यामुळे १५० पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईकरांचा महापौर होईल. काही लोक आपल्या मतांच्या लांगुलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतायेत. मात्र हा प्रयत्न हाणून पाडण्याचा आमचा निर्धार आहे. ज्या लोकांनी मुंबईत पालिकेत २५ वर्षे भ्रष्टाचार करून मुंबई विकून खाल्ली आणि आता स्वतःचे राजकीय अस्तित्व जिवंत करण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत.” अशी सडकून टीका मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर केली.
आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे
पुढे त्यांनी ठाकरे कुटुंबावर धारेवर धरले. साटम म्हणाले की, “मुंबई महापालिका कुठल्या एका परिवाराची जहांगीर आहे असे जे समजतात त्यांना उत्तर देणे महत्वाचे आहे. उमेदवारांबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. धनुष्यबाण आणि कमळ दोन्ही एकच आहेत. आमच्यामध्ये आणि दुस-यांमध्ये फरक हाच आहे की, एकमेकांच्या घरी गणपतीला गेलो, दीपोत्सवाला एकत्र दिसलो किंवा रक्षाबंधनाला जातो हा मुद्दा नाहीये. आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत राजकारण करणारे नाही,” असाही टोला अमित साटम यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : काँग्रेसच्या पाठीत खुपसला खंजीर? प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राजीव सातवांच्या पत्नीचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादीचा मुंबईबाबत महायुतीमध्ये वाद सर्वांसमोर आला आहे. अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाता बाहेरचा रस्ता दाखवत नबाव मलिकांवर जबाबादारी दिली. यावरुन महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणंघेणं नाही. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याच्यातून ते निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत कुठलेही संबंध ठेवणार नाही. मलिक यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली तर त्यांचे स्वागत आहे.” असे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं.