
BMC Election 2026: राज्यातील महापालिका निवणडणुका होऊन आज १० दिवस ओलांडून गेले तरी आजही मुंबई महापालिकेचा महापौर बसू शकलेला नाही. त्यातच आता महापौरपदासोबतच स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून दोन्ही पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर पद आणि स्थायी समितीसह इतर समित्यामध्येही योग्य प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असून काल ते साताऱ्यातील दरे गावी निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे काल दुपारपर्यंत मुंबईतच होते. त्यानंतर ते साताऱ्याकडे रवाना झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते साताऱ्याला गेल्याचे सांगितले जात आहे. तरीही शिवसेना -भाजप यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. मुंबई मबहापालिकेतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी करावी, असा आग्रह धरला होता. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे दरे गावात असल्यामुळे, मंगळवारी राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे शिंदे सेनेच्या २९ नगरसेवकांना घेऊन सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात जाणार आहेत. आज दुपारी १ वाजता हे सर्व नगरसेवक दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापाशी जमतील. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन ते बसने गट नोंदणीसाठी कोकण भवनाकडे रवाना होतील, अशीही माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस परिषदेसाठी परदेशी गेले असताना महापौरपदावरून शिवसेना-भाजपमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला होता. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये नेऊन भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीतील भाजप नेतृत्वाने तडजोड न करण्याची भूमिका घेतल्यामुळे हे नगरसेवक पुन्हा घरी परतले.
देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतल्यानंतर आणि प्रजासत्ताक दिनी मुंबईत असूनही, उभय नेत्यांमध्ये महापौरपद किंवा सत्तावाटपाबाबत अपेक्षित चर्चा झाली नाही. फडणवीसांच्या पुनरागमनानंतरही हालचाली न झाल्याने, आज एकनाथ शिंदे आपल्या २९ नगरसेवकांची स्वतंत्रपणे गटनोंदणी करणार आहेत. यावरून भाजप आणि शिंदे सेनेत अद्याप एकमत झाले नसल्याचे स्पष्ट होत असून, आगामी काळात मुंबईत नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.