धनंजय मुंडे आणि अमित शाह यांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली(फोटो - सोशल मीडिया)
माणिकराव कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात आले आहे. तर बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे देखील मंत्रिपद काढून घेण्यात आले. यानंतर धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली वारी केली. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. पुन्हा अजित पवारांनी घेतलेले क्रीडा खाते हे धनंजय मुंडेंनी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अमित शाहांकडे यासाठी तगदा लावला आहे. मात्र यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केला आहे.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस सर्वांचा टप्पाटप्प्याने कार्यक्रम करणार…! खासदार संजय राऊतांचा इशारा
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद देण्याबाबत वक्तव्य केले आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, काल धनंजय मुंडे हे अमित शाहांना भेटण्याचे मला कळाले. हे कळाल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटले. ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झाले त्यांचा याच सरकारने राजीनामा घेतला. आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय सरकार राजीनामा कसा घेईल. संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कन्येला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. अशी पार्श्वभूमी असताना देखील धनंजय मुंडेंनी अमित शाहांची भेट घेतली याचं मला आश्चर्य वाटलं, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा : काँग्रेसच्या पाठीत खुपसला खंजीर? प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राजीव सातवांच्या पत्नीचा भाजप प्रवेश
पुढे त्या म्हणाल्या की, अमित शाह आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीमागे विकासकामांचं कारण दिलं जात आहे. पण देशाच्या गृहमंत्र्यांकडे विकासाचे काय काम असू शकतं? राज्यामध्ये सत्ता असताना देखील यांच्या आमदाराला दिल्लीला विकासाचे काम घेऊन जावं लागत असेल तर हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. मी याकडे राजकीय हेतून पाहत नाहीये. पण ज्याप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली ते पाहता अमित शाहांनी दिलेली ही भेट आम्हाला खटकली आहे, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.






