CM Devendra Fadnavis mumbai live press conference on uddhav thackeray dasara melava speech
Devendra Fadnavis Live : मुंबई : दसरा मेळाव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे स्वतंत्र दसरा मेळावे पार पडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थावरील मेळाव्यामध्ये महायुतीला बिनडोक्याचं रावण म्हणून हिणवले. यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलेसायबर सेलच्या एका उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, “स्ट्रीट क्राईमपेक्षा सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणात पैसे जात आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने देशातील सर्वात चांगले सायबर क्राईम सेंटर सुरु केले आहे. सायबर क्राईम होऊनच नये यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. या जनजागृतीसाठी केंद्र सरकारकडून या संपूर्ण महिन्यामध्ये प्रयत्न करण्यात येणार आहे,” याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर निशाणा साधला. माध्यमांनी फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत विचारलं. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, “काल मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. पण भाषण संपल्यावर जे भाषण ऐकणारे आहे त्यांना याबद्दल विचारणा केली. मला १ हजार रुपयाचा फटका आहे का, उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का, असे विचारले. उद्धव ठाकरे संपूर्ण भाषणात विकासावर एक मुद्दा बोलले नाहीत. ते बोलूच शकत नाही. त्यांचं बोलणं हे स्व:गत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती. त्यामुळे त्यांचं बोलणं हे स्व:गत होतं. तरीही त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, पालिकेला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करुन दाखवलं आणि माझे १००० रुपये वाचवले, त्याबद्दल आभार,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “राजकारण त्यांनी बाजूला ठेवलं तर आम्हीही ठेवलं. आम्हीही ठेवलं. त्यांनी अतिवृष्टी बाबत राजकारण सुरू केलं. तेही सत्तेत होते. सत्तेत असताना जेव्हा जेव्हा आपत्ती आली तेव्हा त्यांनी काय केलं हे पाहावं. अशा प्रकारच्या आपत्तीत विरोधी पक्षाने काय केलं, काय निर्णय घेतला. काय जीआर केला याचा त्यांनी आरसा पाहावा. राहुल गांधींना भारताच्या संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाहीये. कारण ते भारताचा इतिहास जाणत नाहीत. त्यांच्या आजीने आणीबाणी लागू करून संविधान बदललं. एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्यांना उलथवून लावलं. यांचा दिमाग कमजोर आहे. राहुल गांधी हे सीरिअल लायर आहेत,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.