cm devendra fadnavis nagpur press confence on uddhav raj thackeray come together
नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांचा वाढदिवस हा राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांचा विषय ठरला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छा. मनसे नेते राज ठाकरे यांनी मागील मतभेद विसरुन तब्बल दोन दशकांनंतर मातोश्रीवर भेट दिली. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधूंचे एकत्रित येणे ही आनंदाची बाब आहे. आनंदाची गोष्ट आहे याच्या करता राजकीय दृष्टिकोनातून कशाला पहायचे. आमच्याही शुभेच्छा आहे. जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणे याच्याकडे राजकारणातून पाहु नये, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसले आहे. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल.. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे. काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात जे आहे ते महाराष्ट्राच्या मनातील आहे असं म्हणणं योग्य नाही. ते फार मोठे स्टेटमेंट होईल,” असा खोचक टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून बैठकांबाबत सुनावले. मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रामध्ये ‘या पुढच्या बैठका माझ्या अध्यक्षतेखालीच घ्याव्यात’ अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना दिल्या आहेत. यावरुन महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अशा प्रकारे पत्र लिहून कोणी वाद निर्माण करू नये. मंत्र्यांनी आपसात बोलावे. आणि त्यांना काही अडचणी असेल तर त्यांनी मला येऊन सांगावे. म्हणजे त्याच्यातील अडचणी दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघे शासनाचे भाग असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे याच्यात कुठलंच कन्फ्युजन नाही. मात्र राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणे चुकीच आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे पण काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही. मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते. मंत्री आणि राज्यमंत्री दोघांनी सामंजस्य दाखवल पाहिजे. काही अडचण असेल माझ्याशी बोलल पाहिजे,” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.