cm devendra fadnavis on manikrao kokate bad behavior and controversial statement
CM Fadnavis on Manikrao Kokate : नागपूर : महायुतीमधील अनेक नेते हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. वादग्रस्त विधाने आणि बेशिस्त वर्तन यामुळे मंत्रिमंडळातील नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाचे नेते व मंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या आवारामध्ये जंगली रमी खेळ खेळताना दिसले. यावरुन मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले असून त्यांना क्रीडा क्षेत्र देण्यात आले आहे. तर दत्तात्रय भरणे हे राज्याचे नवे कृषीमंत्री झाले आहेत. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जी घटना घडली त्या संदर्भात मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकाटे यांचे खाते बदलले आहे, त्यांना दुसरे खाते देण्यात आले आहे आणि कृषी खात दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. आता तरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांना तंबी देखील दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता या प्रकारे कोणीही बेशिस्त वर्तन करेल, तर त्यांना सर्वांना सांगितलं आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही, कारवाई केली जाईल. सर्वांसाठी संकेत आहे जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. मात्र, त्यावेळेस आपण काय बोलतो, कसं वागतो, आमचा व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील इतर नेत्यांना तंबी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेतल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. माझी वाटचाल पुढे चालू राहणार आहे. दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, त्यांना मी मदत करेन. त्यांना हे खाते सोपवल्यामुळे खात्याला न्याय मिळेल. जेव्हा गरज पडेल, तेव्हा मी दत्तात्रय भरणे यांची मदत करेन. मी नाराज नाही, I AM VERY HAPPY,” अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.