मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असून राजकारण देखील रंगले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील घेतला आहे. आणि हरयाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूका देखील संपल्या आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते जोरदार तयारीला लागले आहे. आता महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. कॉंग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत घोषणा केली आहे.
माध्यमांशी संवाद साधून नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेचे घोषणा केली आहे. उद्या (दि.11) महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. ही संयुक्त पत्रकार परिषद असून घटक पक्ष असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे गट आणि कॉंग्रेस पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेमधून महायुतीचा पंचनामा करणार असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या नेत्यांची ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्या होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला समोर येणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेवर राज्यभरातून लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : अजित पवार यांनी हरयाणाच्या निकालातून खूप काही शिकले पाहिजे…; रोहित पवारांचा टोला
दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला. याचे पडसाद राज्यांच्या राजकारणावर देखील होत आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊत यांनी राज्यातील कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “संजय राऊत काय बोलतात अन् काय लिहितात याच्यावर आमचं लक्ष नाही. हरयाणा आणि महाराष्ट्रामधील फरक कळत नसेल तर तो त्यांच्या प्रश्न आहे. वेळ आल्यावर यांचं उत्तर देऊ. आमच्यापेक्षा महायुतीमध्ये जास्त धुसफुस आहे,” असे विधान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.