४ उमेदवारांचे नामांकन दाखल (Photo - Social Media)
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया वेगात सुरू आहे. शनिवारी नामांकन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 4 उमेदवारांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आतापर्यंत नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या 6 झाली आहे. शनिवारी 7 व्यक्तींनी एकूण 15 नामांकन अर्ज घेतले.
शनिवारी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये अशोक वामन हिवाळे (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) आणि आशीष मनोहर अंबुलकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने नामांकन अर्जाची विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्जाची छाननी होईल, तर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
अमरावती मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
शिक्षक मतदारांना मतदानासाठी रजा
विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासह इतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये द्विवार्षिक निवडणुका होत आहेत. पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-ब अंतर्गत विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे.
खाजगी संस्थांना दोन तासांची विशेष सवलत
खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत शिक्षक मतदारांना ही रजा लागू होणार नाही. अशा मतदारांना मतदानाची संधी मिळावी, यासाठी संबंधित खाजगी संस्थांना दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी शिक्षक मतदारांनी आपल्या मताधिकाराचा प्राधान्याने वापर करावा, असे आवाहन केले आहे.






