Congress Rohan Suravase warns who defame Chhatrapati Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj
पुणे : मागील आठवड्याभरापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अनेकांनी वादग्रस्त विधाने केले आहेत. त्याचबरोबर औरंगजेबाची कबर उखडण्याची देखील मागणी केली जात आहे. याचे पडसाद नाशिकमध्ये तीव्र स्वरुपात दिसून आले आहेत. नाशिकमध्ये एका जमावाने याच मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेत जाळपोळ आणि दंगल केली. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्यांना युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला आहे.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी त्यांचे मत मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य कोणा एका धर्माचे किंवा जातीचे नव्हते, ते रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराजांच्या मावळ्यात सर्व जाती, धर्माचे लोक होते. कपटी आणि स्वराज्यविरोधी स्वकीयांची त्यांनी तमा बाळगली नाही, तसेच मृत्यूनंतर वैर संपते, अशी शिकवणही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्तनातून दिली. त्यामुळे थोरल्या आणि धाकल्या धन्याची बदनामी करणाऱ्यांना वेळीच आवर घातला पाहिजे, असे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुरवसे पाटील पुढे म्हणाले की, “पुढच्या पिढीला इतिहास सांगायचा असेल, तर दोन्ही बाजू सांगाव्या लागतील. उगाच जाती-धर्माच्या नावाने समाजामध्ये दुही पेरण्याचे काम कोणी करू नये. पूर्वजन्मीचे कोण होते ते आता आले असे सांगण्याचा कोणी आगाऊपणा करण्याचे कारण नाही. इतिहास झाकला जाणार नाही, पुसला जाणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे, तोपर्यंत चंद्र-सूर्य असणार आहे. इतिहासात छेडछाड केली, तर कर्तृत्त्ववान राजे, महाराजांचा पराक्रम जसा झाकोळला जातो. काही व्यक्तिमत्वे अन्यायकारक होती, त्यांनी प्रजेचा छळ केला, हे ही वास्तवाने समोर आल्याशिवाय त्यांचा वध का केला, हे पुढे येत नाही, असे मत रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अन्यायी राजांनाच या भूमीत गाडले, इथे त्याची कबर आहे, हा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळला पाहिजे. अन्यायकारक राजांच्या कबरी फोडण्याची भाषा करून आपल्या राजांचा इतिहास आपण पुसतो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीपासून दूर जातो आहोत, याचे भान ठेवायला हवे. ते भान नसल्याने केलेल्या वक्तव्यातून नागपूरसारख्या दंगली उसळतात. त्यामुळे थोरल्या-धाकल्या धन्याची बदनामी करणाऱ्यांना आता आवर घालण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट मत रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.