amruta fadnavis target sharad pawar and uddhav thackeray
नागपूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सर्वत्र होत आहे. महायुती व महविकास आघाडीकडून त्यांची मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्न शरद पवार गटाचे सुरु असल्याची टीका केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा याबाबत मत व्यक्त केले आहे. यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी स्त्री शक्तीचे आणि राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले. अमृता फडणवीस म्हणाल्या, “राज्य सरकारची लाडकी बहीण योजना हिट झालेली योजना आहे. देवेंद्र फडणवीसांनी जी संकल्पना मांडली ती महत्त्वाची आहे. प्रत्येक स्त्री जी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही तिच्या मागे त्यांना उभं राहायचं आहे. त्या विचारांतून आलेली ही संकल्पना आहे. एक सशक्त स्त्री तिच असते जी अशा संकल्पनाचा फायदा घेऊन कुटुंबासाठी त्याचा वापर करते. लाडकी बहीण ही एकच नाही तर अशा अनेक योजना भाजपाने आणल्या आहेत. सुकन्या समृद्धी, लेक लाडकी, माझी कन्या भाग्यश्री, अन्नपुर्णा योजना, विधवा पेन्शन योजना, एसटी प्रवासात 50 टक्के सूट या योजनाही भाजपाने आणल्या आहेत. तुम्हाला या योजना माहीत नसतील तर माहीत करुन घ्या इतर महिलांनीही याची माहिती द्या,” असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंना टोला
पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी माझे घर माझी जबाबदारी असा नारा दिला होता. यावरुन अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “अनेक योजना चालू राहण्यासाठी आणि विकासासाठी आपण जसं मोदींना निवडून आणलं तसं महाराष्ट्रातही भाजपा भक्कम होणं आवश्यक आहे. काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या प्राथमिकता काय? तर ती असते माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपण स्त्रिया हे म्हणू शकतो कारण कुटुंबाचा आपण भाग आहोत. पण जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की माझं कुटुंबच माझी जबाबदारी तर तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी. मोठे नेते म्हणू शकत नाही. देवेंद्र फडणवीस असं कधी म्हणाले नाहीत आणि म्हणणार नाहीत कारण त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे,” असे टोला अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
शरद पवारांवर निशाणा
पुढे त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शरद पवार यांचे नाव न घेता अमृता फडणवीस यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या की, “आमच्या घराची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी माझ्यावर सोडली आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, ते महाराष्ट्रातल्या महिलांसाठी, वंचित घटकांसाठी 24 तास काम करतात. त्यामुळे अशी व्हिजन असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत. तुम्ही साथ द्याल याची मला खात्री आहे. तुम्हाला बाहेर पडायचं आणि लोकांनाही बाहेर काढायचं आहे की सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे की तुम्ही मतदान करा. आपल्या सगळ्यांची प्रगती त्यात आहे. असं झालं तर मग असे नेते येणार नाहीत ज्यांना आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. ज्यांना लोकांची काळजी आहे असे लोक पुढे आले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने मतदान करा,” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.