महायुती सरकारमध्ये 'या' कारणामुळे वादाची ठिणगी; अजित पवारांच्या बैठकीला शिंदे गटाची दांडी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सध्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे काही प्रमाणात मतभेद दिसून येत आहे. त्यातच रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, विकासकामे रखडण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन्ही ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीची स्वतंत्र बैठक आयोजित केली. मात्र, या बैठकीतही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. रायगड जिल्ह्यासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, गोगावले उपस्थित राहिले नाहीत.
याशिवाय, रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी देखील या बैठकीला पाठ फिरवली. आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी त्यांना निमंत्रण न मिळाल्याचे कारण दिले. गोगावले त्या दिवशी रायगडमध्येच होते. मात्र, तरीही त्यांनी बैठक टाळल्याची चर्चा आहे.
जिल्हा प्रशासनाच्या कामावर होतोय परिणाम
पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्ह्यांच्या प्रशासनावर परिणाम होत असून, विकासकामांमध्ये दिरंगाई होत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे. यामुळे या दोन जिल्ह्यांसाठी तातडीने पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी वाढत आहे. दरम्यान, मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी या वादाचा ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही.
डीपीसी बैठकीमध्ये मंत्र्यांची अनुपस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्यांचे नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत म्हणून अशा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, मंत्र्यांची अनुपस्थिती हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना पालकमंत्री केव्हा मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाची कोंडी दिवसेंदिवस वाढतीये
राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे महायुतीपासून काहीसे दूर जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकींना अनुपस्थित राहण्याचा सिलसिला सुरू केला आहे, त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबत तर्क-वितर्क वाढले आहेत. इतकेच नव्हे तर, ते महायुतीच्या कोणत्याही सभेतही दिसत नसल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.