
MP Sanjay Raut Target Mahayuti and CM Devendra Fadnavis on Local Body Elections
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तसेच उमेदवारीवरुन जोरदार राजकारण रंगल्यानंतर आता राजकीय टीका-टिप्पणी सुरु आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पोलीस कर्मचारी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात अविनाश जाधव यांनी व्हिडिओ देखील शेअर केला असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेल्याच्या कथित व्हिडिओ संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ठाण्यातील जो व्हिडिओ समोर आला आहे, तो राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी उघड केला असून तो अतिशय गंभीर आहे. पोलीस उमेदवारांच्या घरी जातात, त्यांना पकडून थेट एकनाथ शिंदे यांच्या घरी घेऊन जातात. हा पोलिसांचा नाइलाज असू शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही शिवसेना आणि मनसेला घाबरले आहात. आमच्याशी थेट लढा. तुम्ही आमचा पक्ष चोरला, तरीही आम्ही लढत आहोत.” असा घणाघात खासदार राऊतांनी केला.
हे देखील वाचा : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा
पुढे ते म्हणाले की, “पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग काही करत नाही आणि मग आम्हाला न्यायालयात जावं लागतं. कुलाबा प्रकरणाच्या अहवालात राहुल नार्वेकर यांचं नाव का नाही? अहवालात त्यांच्या व्हिडिओचा उल्लेख का करण्यात आलेला नाही? अध्यक्षांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जसा पार्थ पवारांना वाचवण्यात आलं. तुम्ही धमक्या देता, हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा काढा असं म्हणता. या सगळ्यात RO चा बळी दिला जात आहे,” असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराचा बादशाह म्हणजे भाजप
खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “फडणवीस काय बोलतात, याचा मी मुख्यमंत्री आहेत म्हणून गांभीर्याने विचार करतो. नाहीतर त्यांच्या पक्षातसुद्धा त्यांचं कोणी ऐकत नाही. अजित पवार म्हणतात भाजपची भूक बकासुरासारखी आहे. भ्रष्टाचाराचा बादशाह म्हणजे भाजप. तुम्ही अदानीसोबत युती केली आहे आणि आम्हाला कार्टूनिस्टसोबत युती केल्याचं म्हणता. बाळासाहेब ठाकरे हेही व्यंगचित्रकारच होते. कार्टूनिस्ट किंवा कॅमेरामन व्हायला किती मेहनत घ्यावी लागते, हे तुम्हाला माहिती आहे का?” असा सवाल खासदार राऊतांनी महायुतीसमोर उपस्थित केला.
हे देखील वाचा : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा
त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांनी प्रचाराचा धुराळा उडणार आहे. याबाबत राऊत म्हणाले की, “मुंबईत एकच संयुक्त सभा घेण्याचा निर्णय झाला आहे. ही दणदणीत सभा शिवतीर्थावर होणार आहे. सर्व कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असल्यामुळे ६–७ सभा न घेता मोजक्याच संयुक्त सभा घेण्याचं ठरवलं आहे. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुंबईत एक संयुक्त सभा, तसेच कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नाशिक येथे संयुक्त सभा होतील. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे स्वतंत्र सभा घेतील,” असा प्रचाराचा कार्यक्रम खासदार संजय राऊतांनी सांगितला आहे.