Dushyant Chautala in Haryana assembly elections
हरियाणा : भाजप पक्षाला मागील दोन लोकसभा निवडणूकीपेक्षा यंदाच्या निवडणूकीमध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही. 400 पारचा नारा दिलेला असताना देखील स्वबळावर सत्ता भाजपला मिळवता आली नाही. यानंतर पूर्वी भाजपसोबत असणाऱ्या अनेक पक्षांनी आता साथ सोडत विरोधी भूमिका घेतली आहे. आता हरियाणा विधानसभा निवडणूकीचा धुराळा उडाला आहे. देशातील भाजप सरकारच्या मागील कार्यकाळामध्ये शेतकरी आंदोलनाने देशाचे वातावरण तापले होते. मोदी सरकारने शेतकरीसाठी तीन नवीन कायदे आणले होते. त्याकाळामध्ये उत्तर भारतीय शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. आता हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये देखील या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा समोर येत आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत केलेली युती ही सर्वांत मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.
2021 साली कृषी कायद्यामुळे देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. शेतकऱ्यांना याला तीव्रव विरोध करत तब्बल 378 दिवस आंदोलन केले. याचा परिमाण आता हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये देखील होत आहे. या आंदोलनावेळी घेतलेल्या भूमिकेबाबत हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. या शेतकरी आंदोलनावेळी घेतलेली भूमिका चूकीची असल्याचे म्हणत त्यांनी भाजप पक्षावर हल्लाबोल केला आहे.
ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक
हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. प्रचारावेळी चौटाला म्हणाले, “आम्ही भाजपसोबत सरकार चालवलं. विकासकामे केली. मात्र, निवडणुकीत काही गोष्टींवर सहमती झाली नाही, तेव्हा भाजप आणि आमचे रस्ते वेगळे झाले. शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होते. त्यावेळी भाजपसोबत राहण्याची भूमिका घेणं, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ती चूक आज स्वीकारत आहे. हरियाणातील जनता या निवडणुकीत साथ देईल,” अशी ग्वाही दुष्यंत चौटाला यांनी दिली आहे. यामुळे आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
दुष्यंत चौटाला हे शेतकरी आंदोलनावेळी भाजपसोबत सत्तेमध्ये होते. यावेळी त्यांनी भाजपने आपल्याला पुढे केल्याची खंत देखील व्यक्त केली. ते म्हणाले की, “शेतकरी आंदोलनात सर्वांत मोठा खलनायक मला ठरवण्यात आलं. आमच्या पक्षातील एकही सदस्य लोकसभा सदस्य आवाज उठवण्यासाठी नव्हता. आज नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहेत. पण, तेव्हा भाजपसोबत सरकार स्थापन केलं नसतं, तर हरियाणाच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसती,” असं देखील दुष्यंत चौटाला यांनी स्पष्ट केलं.