
महाविकास आघाडीत बिघाडी, तर महायुतीतही बेबनाव; सांगलीत नेमकं घडतंय काय?
खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली होती, तर दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र असल्याच्या घोषणा झाल्या, मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र चित्र वेगळे पाहायला मिळाले, या महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. या प्रत्येक पक्षांनी स्वतंत्र लढत एकमेकांना अप्रत्यक्ष मदत करण्याची भूमिका घेऊन समझोता केल्याचेही दिसत आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकीत भाजपने आमचा मान- सन्मान ठेवला नाही. राज्यात सर्व ठिकाणी भाजप व शिंदेसेनेची युती असताना सांगलीत मात्र ‘अंडरइस्टिमेट’ केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागात आमचे उमेदवार उभे करणार आहे. निवडणूक ताकदीने लढून आमची ताकद नक्कीच दाखवून देऊ, असा इशारा पर्यटनमंत्री तथा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी दिला. महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी (अजित पवार) गट बाहेर पडल्यानंतर शिंदेसेनेबरोबरची जागा वाटपाची चर्चा फिस्कटली आहे. महापालिकेत भाजने शिंदेसेनेला बरोबर घेण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी सर्व प्रभागातील ७८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती.