
Eknath Shinde
Eknath Shinde : गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दरे येथे आले आहेत. दरे गावातील त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रकारचे कृषी प्रयोग सुरू असून, जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त त्यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. यावेळी त्यांनी शेतीतील प्रयोग, राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि लंडन दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेवर भाष्य केलं.
लंडन दौऱ्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी मिश्कील शब्दांत प्रतिक्रिया दिली. गावी आलो, दिल्लीत गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी होते, असं ते म्हणाले. या ‘पोटदुखी’वर कोणतं झाड आहे का, ते पाहावं लागेल किंवा ‘जमालगोटा’ द्यावा लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
विरोधकांच्या आरोपांना केवळ टीका करून उत्तर देण्याऐवजी कामातून उत्तर देईन, मी कामाचा माणूस आहे, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
जागतिक बांबू लागवड दिनाचं औचित्य साधून शिंदे यांनी बांबूची लागवड केली. बांबूपासून इथेनॉलसह विविध उपयोगी वस्तू तयार करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
Eknath Shinde Live । दरे,सातारा पत्रकारांशी संवाद – लाईव्ह https://t.co/tjpqs66ll4 — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 18, 2026
दरम्यान, दरे येथील त्यांच्या शेतात सफरचंद आणि ब्ल्यूबेरीच्या लागवडीचे प्रयोग करण्यात आले आहेत. यासोबतच कापूर आणि हिंगाच्या लागवडीचाही प्रयोग करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात ब्ल्यूबेरीची लागवड शक्य असल्याचा अनुभव या प्रयोगातून मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.
राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचं सांगत शिंदे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं. संबंधित भागांचे पालकमंत्री दौरे करत असून, आपणही लवकरच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पिकं करपून गेलेल्या भागांमध्ये तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.
‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला