
Ramdas Kadam on Sunil tatkare
Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवार यांच्या अपघाताला 10 महिने उलटले, तरी या प्रकरणाभोवतीचं राजकीय वादळ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजितदादांच्या अपघातामागे घातपात होता का, असा सवाल काही नेत्यांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. आता या सगळ्या प्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेत थेट खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार हे अजितदादांच्या अपघाताबाबत पत्रकार परिषद घेऊन आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याआधीच रामदास कदम यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जुन्या राजकीय घडामोडींचाही उल्लेख केला. तटकरे यांच्याबाबत लोक आपल्याला आधीपासूनच वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते, असं कदम म्हणाले. विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.
Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
विशेष म्हणजे, महायुती असतानाही गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना मदत करून ठाकरे गटाला पाठिंबा दिल्याचा आरोप कदम यांनी केला. तटकरेंना आपल्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कदम यांनी पोयनार धरणाच्या मुद्द्यावरूनही तटकरेंना लक्ष्य केलं. कोकणातील धरणांच्या कामांवरून याआधी झालेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी तटकरेंना जाब विचारला. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यामुळे 14 गावांतील लोक पाण्यापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा हे आरोप मागे घेण्यात आले,’ असे खळबळजनक आरोप त्यांनी केले.
या सगळ्या राजकीय आरोपांदरम्यान रामदास कदम यांनी सर्वात महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात होता का आणि त्यामध्ये सुनील तटकरे यांचा काही हात आहे का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
आता यावरून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं असून अजितदादांच्या अपघाताबाबत कोणते नवे मुद्दे समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ans: रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात होता का, असा सवाल उपस्थित केला आहे.
Ans: अजित पवार यांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का आणि त्यामध्ये सुनील तटकरे यांचा काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.