
Gyanesh Kumar Election Commission, Rahul Gandhi CEC Allegations
Congress March Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाचे (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांमध्ये एसआयआरच्या मुद्द्यावरून झालेले मतभेद चव्हाट्यावर आल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतील फेरफारीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयोगातील मनमानी कारभार आणि निवडणूक प्रक्रियेतील विरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि एसआयआर (SIR) यांच्यातील मतभेदांविरोधात विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.आज काँग्रेस निवडणूक आयोगापर्यंत देशव्यापी मोर्चा काढणार आहे. दरम्यान, गुरुवारी राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.इतकेच नव्हे तर, राजीनामा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसवर पराभवाने खचून गेल्याचा आणि त्यांच्यात राजकीय ताळमेळ नसल्याचा आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस आज देशभरात निवडणूक आयोगाच्या कार्यालयांपर्यंत मोर्चा काढणार आहे. आरजेडी बिहारमधील सर्व जिल्हा मुख्यालयांसमोर निदर्शने करणार आहे. तर काँग्रेस सह देशभरातील विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग चालवण्याची तयारी सुरु केली आहे.
टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका प्रथमेश गोपाल गवणकर, गौरव सूर्यकांत नखारेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी दाखल केली आहे.
या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांनी विविध निर्णय आणि कार्यपद्धतींबाबत १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. याचिकाकर्त्यांनी मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, मतदार यादी डेटाबेस, ईआरओचे कामकाज आणि ईसीआयनेट प्रणालीशी संबंधित अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.तर वकील ब्रजेश सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करण्याची परवानगी मागण्यासाठी महाधिवक्त्यांना पत्र लिहिले आहे.
सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि एसआयआरच्या मुद्द्यावर ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा किंवा पदावरून हटवावे अशी त्यांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे.
विरोधी पक्षांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, भाजपने गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की निवडणूक आयोगातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेस अनेक दशकांपासून सत्तेबाहेर आहे, हे कदाचित राहुल गांधींच्या अजूनही लक्षात आलेले नाही..