पश्चिम बंगालमध्ये भाजपचा खर्च चार राज्यांपेक्षा अधिक (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ यांसारख्या राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपसह सर्वच पक्षांनी निवडणुकीत जोरदार तयारी केली होती. असे असताना आता या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे. त्यात भाजपने एकट्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २८६.९९ कोटी रुपये खर्च केले आहेत. हा खर्च चार राज्यांच्या निवडणुकीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.
भाजपने पश्चिम बंगाल निवडणुकीत केलेला खर्च या वर्षाच्या सुरुवातीला चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांमधील काँग्रेसच्या २४८.५५ कोटी रुपयांच्या एकूण खर्चापेक्षा जास्त आहे. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या पाच राज्यांमधील भाजपच्या ५२९.३८ कोटी रुपयांच्या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक वाटा पश्चिम बंगालचा होता. पक्षाने बंगालमध्ये सर्वसाधारण प्रचारावर २१७.१६ कोटी रुपये, आणि उमेदवारांवर ६९.८३ कोटी रुपये खर्च केले. भाजपने तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढून पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सरकार स्थापन केले.
जाहीर झालेल्या २९३ जागांपैकी भाजपने २०७, तर तृणमूलने ८० जागा जिंकल्या. राज्यात काँग्रेसने २९३ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि दोन जागा जिंकल्या. पक्षाने आपल्या केंद्रीय मुख्यालय आणि राज्य युनिटमार्फत बंगालमध्ये ४२.०८ कोटी रुपये खर्च केल्याचे कळवले. सर्वसाधारण प्रचारासाठी १२.९६ कोटी रुपये आणि उमेदवार व संबंधित खर्चासाठी २९.१२ कोटी रुपयांचा समावेश होता. २०११ मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी अनेक दशके बंगालवर राज्य करणाऱ्या सीपीआय (एम) ने १९७जागांवर निवडणूक लढवली आणि एक जागा जिंकली.
केरळात काँग्रेसचा १०५.३४ कोटी खर्च
केरळमधील परिस्थिती वेगळी होती. येथे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला सतेतून बाहेर काढले. काँग्रेसने ६३ जागा जिंकल्या, तर सीपीआय (एम) ने २६ जागा जिंकल्या. भाजपने तीन जागा जिंकल्या. काँग्रेसने आपल्या मुख्यालय आणि राज्य शाखेमार्फत केरळमध्ये १०५.३४ कोटी रुपये खर्च केले, जे भाजपच्या ८२.६७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
भाजपकडून कोट्यवधींचा खर्च
काँग्रेसच्या खर्चात सर्वसाधारण प्रचारावर ७१.३० कोटी रुपये आणि उमेदवार व संबंधित खर्चावर ३४.०५ कोटी रुपयांचा समावेश होता. भाजपने केरळमध्ये सर्वसाधारण प्रचारावर ५४.९३ कोटी रुपये आणि उमेदवारांवर २७.७४ कोटी रुपये खर्च केले. केरळमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या सीपीआय (एम) च्या राज्य शाखेने २८.६० कोटी रुपये खर्च केल्याचे कळवले. यामध्ये सर्वसाधारण प्रचारावर २६.३० कोटी रुपये आणि उमेदवारांवर २.३१ कोटी रुपयांचा समावेश होता.
पाच राज्य मिळून काँग्रेसचे प्रचारावर १४३ कोटी खर्च
पाच निवडणुकांमध्ये मिळून, काँग्रेसने प्रचारावर १४३ कोटी रुपये आणि उमेदवारांवर १०५.५५ कोटी रुपये खर्च केले, ज्यामुळे त्यांचा एकूण खर्च २४८.५५ कोटी रुपयांवर पोहोचला. सीपीआय (एम) चा एकत्रित खर्च ३९.०४ कोटी रुपये होता. बंगाल आणि केरळ व्यतिरिक्त, भाजपने आसाममध्ये ९६.२७ कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये ५१.५६ कोटी रुपये आणि पुदुचेरीमध्ये ११.९० कोटी रुपये खर्च केले.






