'हकालपट्टी करून माझी बदनामी केली, आता योग्यवेळी निर्णय घेणार'; बडगुजर यांनी स्पष्ट केली भूमिका
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन करून बजगुजर यांची हकालपट्टी केली जात असल्याची घोषणा केली. यावर आता बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘संघटनेला बाधा येईल असे माझं वाक्य दाखवलं तर संन्यास घेईल’, असे त्यांनी म्हटले आहे.
सुधाकर बडगुजर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला पक्षातून काढल्याचे प्रवासात असताना माहिती मिळाली. तसे मी स्टेटमेंट केलेलं आहे. खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणे तर तो मी गुन्हा केलेला आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती. पहिल्यांदाच कारवाई झाली आहे. निर्णय झाल्यानंतर संपर्क कसा साधतील? पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावे. विलास शिंदेंच्या कार्यक्रमाला सगळे गेले. मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला. म्हणून कारवाई केली’.
हेदेखील वाचा : Raj Thackeray : लेखी अध्यादेश का नाही…? हा सरकारचा डाव नाही ना? राज ठाकरेंच्या मनात पुन्हा चुकचुकली संशयाची पाल
दरम्यान, माझ्यावर केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही. मला एक वाक्य दाखवा मी पक्षविरोधी काय काम केलं. कोरोना काळात काम केलं, रक्तदान शिबिर घेतले, शाखा उद्घाटन केलं. कार्यालयात काम केलं, संघटना बांधणीसाठी काम केलेले असताना कारवाई केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. निवेदन दिले.
पक्षात निर्माण झाले वादळ
ते पुढे म्हणाले, ‘पक्षात वादळ निर्माण झाले. आता निवडणूक नाही, सदस्य नाही. प्रश्न प्रलंबित आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. पक्षाच्या नेतृत्वाला मी ते सांगितले होते. आज मी पत्रकार परिषदेला नव्हतो. हे मी सांगितले होते. बडगुजर हा पक्ष नाही ते बरोबर बोलले. मी संघटनेला बाधा येईल, असे वाक्य दाखवलं तर संन्यास घेईल.
…तर मी राजीनामा दिला असता
मला सांगितलं असते राजीनामा द्या तर मी दिला असता. हकालपट्टी करून माझी बदनामी केली. मला जवळ बोलून सांगायला हवे होते. अचानक निर्णय घेतला, उपनेते पद मी मागितले नव्हते. मी फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. बंद दाराआड चर्चा केली नाही. सर्वांशी बोलून मी निर्णय घेईल. तुमच्याशी बोलून रिलॅक्स झालो. शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडावी. मी माझी भूमिका मांडलेली नाही. जेव्हा विश्लेषण करायचं तेव्हा करेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.