

कोयनेचे पाणी मुंबईला आणण्याच्या योजनेवर गिरीश महाजनांचे विधान
वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी वापरण्याचा प्रस्ताव
सांगली-साताऱ्याचे पाणी घेणार नसल्याचा दावा
मुंबई : राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अश्यातच आता नवा वाद निर्माण झाला असून कोयना धरणातील पाणी मुंबईला आणण्याच्या प्रस्तावावरून राजकीय चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमधील नेते आता एकमेकांवर आगपाखड करायला लागले आहेत. अश्यातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी यावरून मोठे विधान केले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. आपण सांगली किंवा सातारा जिल्ह्याचे पाणी घेत नसून, कोयना जलविद्युत प्रकल्पात वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी मुंबईला आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाजन यांच्या म्हणण्यानुसार, "२०१४ ते २०१९ या काळात कोकणातील प्रकल्पांबाबत चौकशी सुरू असताना मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी कोयनेच्या पाण्याचा पर्याय विचाराधीन होता. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतर पाणी वशिष्ठी नदीच्या माध्यमातून समुद्रात जाते. या पाण्याचा अन्य उपयोग करता येईल का, याचा अभ्यास करण्यात आला होता."
या प्रस्तावानुसार लोटे औद्योगिक वसाहतीला सुमारे पाव टीएमसी पाणी देण्याचा विचार होता. तसेच मार्गातील एमआयडीसींनाही पाणी उपलब्ध करून देऊन उर्वरित पाणी मुंबईला आणण्याचे नियोजन असल्याचे महाजन यांनी सांगितले. जुन्या योजनेला पुन्हा चालना देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देताना महाजन म्हणाले की, कोणाच्या मनात शंका असतील तर बैठक घेण्यास आम्ही तयार आहोत. योजनेची संपूर्ण माहिती आणि परिस्थिती सर्वांसमोर मांडली जाईल. रोहित पाटील यांचा उल्लेख करत त्यांनी या विषयाचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. सांगली किंवा साताऱ्याचे पाणी घेतले जात नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर बोलताना महाजन यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. १२ जागांवर बिनविरोध विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला. उर्वरित ९ जागांवर लढत असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
एकाच पत्रकार परिषदेत कोयना पाणी योजनेपासून जळगावमधील गंभीर घटनेपर्यंत आणि जिल्हा बँक निवडणुकीपर्यंत विविध मुद्द्यांवर महाजन यांनी भूमिका मांडली. आता कोयना पाणी योजनेच्या प्रत्यक्ष आराखड्याबाबत आणि पाणीवाटपाच्या तांत्रिक बाबींबाबत अधिकृत माहिती कधी समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.