फोटो सौजन्य - Social Media
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा ते ‘पालकमंत्री कक्षा’त जनतेसाठी उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’त जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास मदत झाली.
‘पालकमंत्री कक्षा’त आलेल्या नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळानंतर जिल्हा नियोजन सभागृहात तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्या. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणे जागेवरच निकाली निघाली. काही तक्रारींसाठी पुढील प्रक्रियेचे निर्देश देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “पालकमंत्री म्हणून जनतेच्या सेवेसाठी मी सातत्याने उपलब्ध राहणार आहे. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातून एक दिवस हा कक्ष सुरू ठेवला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळावी आणि त्यांची कामे जलद गतीने मार्गी लागावी, हा या कक्षाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे.” ते पुढे म्हणाले की, जनतेला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा, यासाठी ‘पालकमंत्री कक्ष’ अधिक सक्षम केला जाणार आहे.
नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी अनेक ठिकाणी फिरावे लागू नये, यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कक्षात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाची तत्परता वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी अधिक जलद सोडवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी सहज व्यासपीठ मिळणार असून, त्यांचे प्रलंबित प्रश्न जलदगतीने निकाली काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन विकास कार्यांना गती मिळेल.