Baramati By-Election बिनविरोध होणार? छगन भुजबळ थेट शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंचे मोठे संकेत
“निवडणूक बिनविरोध व्हावी, हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन असून त्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजितदादांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक लढवावी लागत आहे, जी एक कठीण परिस्थिती आहे. मात्र, सर्वजण पाठिंबा देत असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्ग काढू. सुनेत्रा वहिनींना आमच्या टीमचे ‘कॅप्टन’ करण्यात आले आहे. असं भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळ म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जयराम रमशे यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली आहे. मी स्वत: आणि दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली आहे. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. सु्प्रिया सुळे यांनीही आम्ही उमेदवार देणार नसल्याचे आधीच जाहीर केलं होतं.
यावेळी राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत कलह असल्याचे आणि काही पत्रे समोर आल्याचे भुजबळ यांनी मान्य केले. मात्र, या गोष्टी मीडियात चर्चेला आणण्याची गरज नाही, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यावर तोडगा काढतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आज अजित पवार आपल्यासोबत नाही. अशा कठिण परिस्थितीत ही निवडणूक आपल्याला लढवावी लागत आहे. मात्र, राजकीय कटुता टाळण्यासाठी हमरीतुमरीची गरज नाही. प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असले तरी लोकशाहीत विनंती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनीदेखील आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. आम्ही शेवटपर्यंत ही निडणूक बिनविरोध लढवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. तसेच, आम्ही लक्ष्मण हाके यांचीही समजूत काढली आहे. काँग्रेससोबतही लवकरच चर्चा करू आणि मार्ग काढू, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.






