भाजपमधील अंतर्गत नाराजीवर शिवेंद्रराजेंचं भाष्य
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून आता महायुतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीत भाजपला दोन्ही पदांपासून दूर राहावं लागल्यानंतर मित्रपक्षांमधील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. आधी मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका मांडली होती. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही यावर भाष्य करत घडलेल्या घटनांचा खुलासा केला आहे. (Satara DCC Bank Election)
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचना आणि सुचवलेली नावे आपण वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली होती, असं शिवेंद्रराजे यांनी सांगितलं. मात्र चर्चा होऊनही संबंधित मित्रपक्षांनी ‘आमचा निर्णय आता झाला आहे’ असं सांगत वेगळा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला.
त्यामुळे वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतरही स्थानिक पातळीवर वेगळंच राजकीय गणित जुळल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
या सगळ्या घडामोडींवर बोलताना शिवेंद्रराजे यांनी आपण युती टिकवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळण्यासाठी आणि महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी आपण माघार घेतली. आपल्याकडे पुरेसं मतदान असतानाही कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
इतकंच नाही, तर भाजपच्या उमेदवारांविरोधात पक्षांतर्गत कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकाराचा मतदानात काहीसा फटका बसल्याचं सांगत त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.
दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढलं असतं तर सत्तेत आलं असतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला हवेत, असंही ते म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेचे अधिकार शिवेंद्रराजे यांच्याकडेच होते आणि नेमकी काय चर्चा झाली, याची आपल्याला माहिती नसल्याचंही गोरेंनी स्पष्ट केलं होतं.
आता शिवेंद्रराजेंच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सूचना, स्थानिक पातळीवरील निर्णय आणि भाजपमधील कथित अंतर्गत मतभेद यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.






