
राज्यातील अनेक भागांत मतदानापूर्वीच पैशांचं वाटप; मतदारांना विविध आमिषं अन्...
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पैसे वाटप, हाणामाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि जळगावसह अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र दिसून आले.
प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता छुप्या पद्धतीने डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये युतीतील मित्र पक्षांमध्येच संघर्ष पेटला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत सुरु असताना पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. हा वाद तुंबळ हाणामारीत बदलला असून, या घटनेत चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी परिसरात तणाव कायम आहे.
हेदेखील वाचा : Municipal Elections : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात; प्रशासनाकडून चोख व्यवस्था
जळगावमध्ये निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २९ लाख रुपयांची रोकड, ३ किलो चांदी आणि ८ तोळे सोने जप्त केले आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे न सादर झाल्याने हा सर्व ऐवज सरकारी कोषागारात जमा करण्यात आला आहे.
वसई-विरारमध्ये पैसे वाटपावरून गोंधळ
वसई-विरारमध्ये मध्यरात्री गांगडी पाडा परिसरात बविआ आणि मनसे कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करत गोंधळ घातला. बोरीवलीतही मनसे आणि भाजप कार्यकत्यांमध्ये संघर्ष झाला असून, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.
पनवेलमध्येही पैसे वाटपावरून वाद
पनवेलमध्ये भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असताना मनसे शहरप्रमुख योगेश चिले यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण-डोंबिवलीतही राडा
कल्याण-डोंबिवली प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी दोन पुरुष आणि एका महिला भाजप कार्यकर्त्यांना पकडले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच परिसरात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार विशू पेडणेकर आणि उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत शिवसेना उमेदवारांनी जाब विचारला. यातूनच वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
हेदेखील वाचा : Municipal Election Voting 2026 Live: राज्यातील २९ महापालिकांसाठी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात