Maharashtra Assembly has not decided on the Leader of Opposition political news
मुंबई : राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. जवळपास महिनाभर सुरु असलेल्या अधिवेशनाचा आता शेवटचा दिवस आहे. धनंजय मुंडे राजीनामा, प्रशांत कोरटकर अटक, अबु आझमी निलंबन, औरंगजेब कबर, दिशा सालियान प्रकरण, नागपूर दंगल अशा अनेक मुद्द्यांवरुन यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले. लाडक्या बहिणींना 2100 रुपयां हप्ता न दिल्यामुळे देखील नाराजी पसरली. मात्र यामध्ये अधिवेशनाचा अखेरचा दिवस आला तरी देखील विधानसभेला विरोधीपक्षनेता मिळालेला नाही. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विरोधी पक्षनेता हा जनतेचे प्रश्न आक्रमकपणे भूमिका मांडून सोड़वण्याचे प्रयत्न करत असतो. सत्ताधारी नेत्यांकडून योग्य निर्णय आणि कामकाज करुन घेण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अद्याप विरोधी पक्षनेता ठरवण्यात आलेला नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी असे प्रचंड बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाविकास आघाडीच्या कोणत्याच मित्रपक्षाला विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येईल असे बहुमत मिळालेले नाही. विधानसभेतील 288 जागांपैकी 10 टक्के जागा या विरोधी पक्षातील आहे. विरोधातील कोणत्याही पक्षातील 29 जागा असल्यास विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येतो. मात्र ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेसकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेऊ शकतात.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुदृढ लोकशाहीसाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेता पद महायुती सरकारने सामंजस्याने हे पद देण्याची आवश्यकता होती. मात्र आता राज्यात सरकार आल्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. मात्र तरी देखील विरोधी पक्षनेता ठरवण्यात आलेला नाही. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावाची विधानसभा विरोधीपक्षनेता म्हणून चर्चा होती. मात्र याबाबत निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षांशी विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलेल. मात्र सरकारला विरोधी पक्षनेते पद द्यायचं नाही. माझ्यासारखा नियमाने चालणारा विरोधी पक्षनेता सरकारला नकोय. शेवटी मी सांगितलं की माझं नाव मागे घ्या पण राज्याला विरोधी पक्षनेता द्या. राज्यघटनेमध्ये देखील विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याचे महत्त्व सांगितले आहे. मात्र त्यावर फक्त चर्चा करण्यासाठी वेळ ठेवला आहे. राज्यघटनेमध्ये पहिले मुख्यमंत्री नंतर विरोधीपक्षनेता आणि त्यानंतर मंत्रिमंडळ आहे. उपमुख्यमंत्री सुद्धा त्या राज्यघटनेला अभिप्रेत नाही. सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलणारा विरोधी पक्षनेता पाहिजेच,” अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.