
mahavikas aghadi alliance with vanchit bahujan aaghadi and mns raj thackeray in vadgaon maval news
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांपुरतीच मर्यादित असलेली राजकीय चर्चा आता अधिक व्यापक झाली आहे. मावळ तालुक्यातील काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पाच पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या माध्यमातून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या संदर्भात सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) तळेगाव दाभाडे येथे महाविकासआघाडीच्या घटक पक्षांच्या तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
या पाचही पक्षांच्या प्रतिनिधींनी एकमताने जाहीर केले की, मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदा तसेच वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुका ‘महाविकासआघाडी’च्या बॅनरखाली लढवल्या जाणार आहेत.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “लोकशाही टिकविण्यासाठी विरोधकांचा आवाज सशक्त राहणे आवश्यक आहे. मावळात जनतेच्या प्रश्नांवर, विकासावर आणि पारदर्शक कारभारासाठी आम्ही पाचही पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवू. मतदारांना एक पर्याय निर्माण करणे ही काळाची गरज आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यांनी पुढे म्हटले की, “आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, पण जनतेच्या हितासाठी एकविचाराने लढण्याचा आमचा निर्धार आहे. योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक वाटाघाटी झाल्यास तालुक्यातील काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकांनाही आम्ही पाठींबा देऊ शकतो.” असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली वेगवान
मावळ तालुक्यात येत्या काही महिन्यांत पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि वडगाव मावळ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये भाजप आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे महाविकासआघाडीचे हे पाच पक्ष संयुक्त रणनिती आखत आहेत. आगामी काही दिवसांत या आघाडीचे संयुक्त जाहीरनामा, प्रचार समिती आणि उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीच्या या घडामोडीमुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार झाले आहे.