
Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे नेमके काय घडते आहे, हे समजणेही कठीण झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून जागावाटपासाठी महायुतीच्या बैठका सुरू होत्या. मात्र काही जागांवर एकमत न झाल्याने काल ऐनवेळी शिवसेना (उबाठा) महायुतीतून बाहेर पडली. यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती कायम राहिली, मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले.
भाजपचे नितीन शेलार, संगीता खरमाळे आणि स्वप्नजा वाखुरे यांनी प्रभाग ३ मधून शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी प्रभाग १० आणि प्रभाग ५ मधून अर्ज दाखल केला असून, त्यांच्या पत्नी अश्विनी जाधव यांनीही प्रभाग १० मधून उमेदवारी अर्ज भरला आहे.
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर यांनी प्रभाग ६ मधून शिंदे शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. भाजपचे नरेंद्र कुलकर्णी यांनी प्रभाग ११ मधून, तर निर्मला कैलास गिरवले यांनी प्रभाग १३ मधून शिंदे शिवसेनेची उमेदवारी घेतली. भाजपच्या गौरी गणेश नन्नवरे यांनी प्रभाग १७ मधून शिंदे शिवसेनेकडून अर्ज भरला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष केतन क्षीरसागर यांनी उबाठा सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मनपा निवडणुकीसाठी एकूण 788 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
अहिल्यानगरचे पहिले महापौर भगवान फुलसौंदर यांनी आज उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीता फुलसौंदर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपच्या सावेडी विभागाचे मंडल अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे यांनी पत्नी मनिषा यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत, त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज शिंदे शिवसेनेकडून दाखल केला. हे पक्षांतर्गत बंडखोरीचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.
उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यानंतर आता उबाठा जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र येथे महाविकास आघाडी असल्याने हे पक्षांतर तडजोडीचा भाग असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.