ncp ajit pawar group Decision to contest local body elections on own
शिर्डी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. पुन्हा एकदा महायुती सरकार येऊन दोन महिने झाले असून सर्व मंत्र्यांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये आता महायुतीचे मित्रपक्ष पुढील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपच्या नंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील पुढील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. शिर्डी येथे राष्ट्रवादीचे ‘नवसंकल्प शिबिर शिर्डीमध्ये सुरु झाले आहे. राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी महायुतीचे मित्रपक्ष शिबिर घेत आहेत. भाजपनंतर आता राष्ट्रवादीचे देखील शिबीर शिर्डीमध्ये होत आहेत.
राष्ट्रवादीच्या या नवसंक्लप शिबिरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चिंतन केले जाणार आहे. तसेच पदाधिकारी व नेत्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे देखील शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी शिबिरामध्ये सामील होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी साईनगरी शिर्डीमध्ये प्रवेश करताच साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधत दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत. सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल,” अशी माहिती जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पुढे दिलीप वळसे पाटील म्हणाले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत देखील वक्तव्य केले. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या आघाडीबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “जर आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढायला तयार आहे.,”असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी महाविकास आघाडी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरुन तुटली आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक या स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. सर्व कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी म्हणून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे गटाने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडी तुटली असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये आता महायुतीमधून देखील अशाच संदर्भातील वक्तव्य समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता महायुतीमध्ये देखील स्वबळावर लढण्याचे वारे वाहत असून याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी सूचक विधान केले आहे.