
नगरपंचायतीच्या निवडणुकीत चुरस पराकाष्ठेला
उमेदवारांमधील स्पर्धा प्रचंड वाढली
मताचा भाव चार हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज
मंचर: मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत चुरस पराकाष्ठेला पोहोचल्याने मतदारांमध्ये ‘भाव खूपच वाढला’ अशी जोरदार चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांमधील स्पर्धा प्रचंड वाढल्याने पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
मंचर शहरात गल्ली–बोळापासून चहाच्या टपऱ्यांवर ठिकाणी एकच विषय चर्चेत आहे.मताचा भाव चार हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूला आणण्यासाठी काही उमेदवारांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ केली जात असल्याची अफवा रंगत असून मतदारांची दिवाळीच सध्या सुरू असल्याचे म्हटले जात आहे.या मतांच्या बाजारामुळे मतदारांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसत आहे. कोण कोण काय देत आहे, कोणत्या पॅनलमध्ये किती व्यवहार सुरू आहेत याबाबत सर्वसामान्यांमध्ये कुजबुज सुरू आहे.
निवडणूक जितकी तोंडातोंडी चर्चेत, तितकीच ती आता पैशांच्या ओघामुळे अधिकच चर्चेत राहणार हे निश्चित आहे.राजकीय वातावरणात वाढलेल्या या पैशांच्या व्यवहारांमुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येत असल्याची चिंता काही नागरिक व्यक्त करत असले तरी बहुसंख्य मतदारांमध्ये ‘या निवडणुकीत खऱ्या अर्थाने दिवाळी आली आहे’ असे वातावरण दिसत आहे.मतदानात या परिस्थितीचा नेमका परिणाम काय होणार, हे मात्र मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
दबावतंत्रामुळे मंचरचे राजकारण तापले
मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी माघारीची अंतिम मुदत शुक्रवार (दि. २१) रोजी असल्याने संपूर्ण राजकीय वातावरणात तणाव वाढू लागला आहे. अनेक प्रभागांत तिढा निर्माण होऊ नये म्हणून पक्षांतर्गत चर्चांचे फेरे सुरू आहेत. काही ठिकाणी उमेदवारांना स्वयंस्फूर्तीने माघार घेण्याचे आवाहन केले जात असताना, काही ठिकाणी मात्र ही प्रक्रिया दबावतंत्रामुळे पूर्णपणे वेगळ्याच रंगात चालू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दबावतंत्रामुळे मंचरचे राजकारण तापले; बंडखोर अन् अपक्ष उमेदवारांच्या हालचालींवर नेत्यांचे लक्ष
काही उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर “तू माघार घे, नाहीतर तुला पाहून घेऊ” अशा दबावयुक्त धमक्या दिल्याची चर्चा जोरात आहे. या दमबाजीमुळे स्थानिक पातळीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, मतदारही या घडामोडींकडे चिंतेने पाहत आहेत. माघारीसाठी केलेल्या राजकीय दबावामुळे गावागावात कुजबुज वाढली आहे.