Manoj Jarange Patil doubts about taking Valmik Karad to hospital as he is not feeling well
जालना : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला दोन महिने होत आले असून यावरुन जोरदार राजकारण देखील रंगले आहे. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र यावरुन संशय व्यक्त केला जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, सुटून जायचे किंवा इतर सर्व षडयंत्र झाले असतील तर आता परत जेलमध्ये जावं, डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करत आहेत, काय ऑपरेशन सुरू आहे? सुटून जायचं ऑपरेशन सुरू आहे का? पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय सुरू आहे? आरोग्य मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालण्याची गरज आहे. आता तो पळून जात नसतो, पोलीस त्याला पाय धरून अपटतील. ती कोणत्या पोलिसाची रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्याचा सगळा सिडीआर तपासला गेला पाहिजे. डॉक्टर तुम्ही जर काही चुकीचे पाऊल उचलली तर तुमची पण चौकशी होणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजकीय बातम्या वाचा वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “डॉक्टर पण गोत्यात येतील, दुखत नसताना का ठेऊन घेतलं आहे. कोण भेटायला येतंय का तिथे, पुढच्या मागच्या दाराने कोण फोनवर बोलतंय का? आरोपींना आयसीयूमध्ये सांभाळायचं की जेलमध्ये ठेवायचं? आरोग्यमंत्री साहेब तुमच्या डॉक्टरांना विचारा नक्की त्याचं दुखतंय काय ? आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेवा, कारण यात खूप शंका येत आहे. त्या रेकॉर्डिंग आलेल्या पीआयला तिथून बाजूला काढा आणि त्याची तपासणी करा. आंधळे, मुंडे, गित्ते यांना न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, ” ज्या महादेव भय्या मुंडे यांची क्रूर हत्या केली, तुमच्याच समाजातल्या लेकी बाळीच कुंकू पुसलं गेलं आहे. त्याचे तीन चार लेकरं दिसत होते, कसं चालवायचं कुटुंब त्या माउलीने, आरोपी जातीचे असले म्हणून काय झालं. मुंडे असो आंधळे असो की गित्ते त्यांच्या कुटुंबानं आवाज दिल्यास त्यांच्या न्यायासाठी पाठीशी उभे राहणार,” अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.