manoj jarange patil press in jalna on mumbai protest for maratha reservation
जालना : राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे एक्शनमोडमध्ये आले आहेत. मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकत्रित करण्याचे आणि संबोधित करण्याचे काम सुरु केले आहे. त्यांनी जालनामध्ये मराठा समाजाला आवाहन केले असून महायुती सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाबाबत आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. सोलापूर नंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर दौरा असणार. हा दौरा झाल्यानंतर मराठा बांधवांची चर्चा करून 29 ऑगस्ट रोजी मुंबईला सर्वांनी निघायचे आहे. ज्याची नोंद निघाली, त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचे, एक घर, एक गाडी निघणार हा नारा सोलापुरातून देतो. प्रत्येकाने आपली वाहन घेऊन निघायचे. एकदम सोपी मोहीम आहे. एक घर, एक गाडी घेऊन निघायचे. सोलापूरच्या युवकांना आव्हान करतो, आरपारची लढाई आहे. रेकॉर्ड ब्रेक सभा होणार. असा समुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही. या लढाईचे तुम्ही साक्षीदार व्हा,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी मुंबईच्या आंदोलनाबाबत माहिती देताना सांगितले की, “29 ऑगस्टची अंतिम लढाई असणार आहे. मुंबई जाताना शांततेत जायचे आणि शांततेत यायचे आहे. विजय मिळवल्याशिवाय परत यायचे नाही. सरकारने जर आपली माणस आंदोलनात घुसवले, तर एक इंचही मागे सरायचे नाही. मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मुंबईकडे जाण्यासाठी 5 हजार पाण्याचे टँकर लागणार आहेत. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. अंतरवाली सराटी येथून सकाळी 10 वाजता आम्ही निघणार. शिवनेरीचा पहिला मुक्काम करावा लागेल, शिवनेरी वरून चाकण, राजगुरुनगर, लोणावळा, आझाद मैदान मार्गाने जावे लागेल,” अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक संस्था निवडणूका आल्यानंतर जरांगे पाटील आंदोलन करत असल्याच आरोप केला जात आहे. याबाबत ते म्हणाले की, “आम्ही निवडणूक आल्या म्हणून आंदोलन कधीच करत नाही. तुम्ही आजी – माजी सरपंच, नगरसेवक नेते या सर्वांना सांगा की, आमच्या सोबत मुंबईला चला. कारण, आम्ही तुमच्यासाठी झटलो आहोत. आम्ही प्रचार करून गुलाल उधळून डोळे फोडून घेतो, तर तुम्ही आमचे लेकरा बाळ मोठ करण्याच्या वेळेस आले पाहिजे. 27% ओबीसी आरक्षण हा निर्णय चांगलाच आहे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जोपर्यंत सरकारकडून कुणबी आणि मराठा हा अध्यादेश येत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. सरकारकडे 58 लाख कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्यांना कायदा पारित करावा लागेल. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहेत, असा GR काढायला काही हरकत नाही,” अशी आक्रमक भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.