manoj jarange patil target cm devendra fadnavis on beed murder case
जालना : बीडमधील हत्या प्रकरणावरुन मागील दोन महिन्यांपासून राज्याचे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे हृद्यद्रावक फोटो देखील समोर आले आहे. या प्रकरणामुळं अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. मात्र या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी न केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील म्हणाले की, “धनंजय मुंडेंसाठी नंबर एकचा आरोपी काम करत होता . त्यांच्या सरकारी बंगल्यावर तशा बैठका झाल्या आहेत .पहिली बैठक त्यांच्या एका कार्यालयावर झाली .त्यामुळे 302 कलमांतर्गत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करायला हवं .फरार आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केले आहेत .खंडणी मागितल्यानंतर आणि खून झाल्यानंतरसुद्धा हे फोन झाले आहेत,” असा मोठा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “धनंजय मुंडे 302 मध्ये गुन्हेगार येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फुलस्टॉप दिलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे स्थानिक पोलिसांना सिग्नल देत नाहीत म्हणून धनंजय मुंडे वाचलेत. या विषयाला फुल स्टॉप द्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना गुप्त आदेश आहेत. यंत्रणेला थांबायला सांगितलं. त्यामुळे तपास यंत्रणा हतबल आहे. राजकीय गुंडाला वाचवण्याचा मित्राचा प्रयत्न सुरु आहे. फडणवीसांनी गुंड वाचवू नये. धनंजय मुंडे विषारी साप आहे. हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे. त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे,” स्पष्ट मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जालनामध्ये एका तरुणाला मंदिरामध्ये जाण्याच्या वादावरुन तळपत्या सळईचे चटके दिले. या प्रकरणावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘चटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावर अन्याय झाला, जेवढे चटके देण्यासाठी होते, सर्वांना आरोपी केलं पाहिजे. पोलिसांनी हे लक्षात घ्यावं—कुणीही सुटता कामा नये. स्थानिक PI याने कोणतेही भेदभाव न करता सर्वांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नंदीवर बसणार कोण आहे, याचा तपास होत नाही, आणि तो केला नाही तर आम्ही आमच्या भाषेत सांगू मग काय? असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.