Maratha leader Manoj Jarange Patil Corruption allegations against Dhananjay Munde
जालना : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळे मागील दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण रंगले आहे. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस, मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचा दावा करुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे नुकतेच आमरण उपोषण स्थगित झाले आहे. यामुळे ते रुग्णालयामध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज, लफेडबाज आहे. राज्याला तो मोठा दुर्देवी डाग आहे. गोरगरीबांची, शेतकऱ्यांची, ओबीसींच सहकार्य घ्यायच आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे. गरज आहे तो पर्यंत जवळ घ्यायच, त्यांनाच मग चुरून खायचा. ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. ती आता उघडी पडली. आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले. या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल, तर सरकार त्याला जवळ करतच कसं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
धनंजय मुंडे यांचे अनेक घोटाळे बाहेर काढणार असल्याचे जरांगे पाटील यापूर्वी देखील म्हणाले होते. यावर पुढे ते म्हणाले की, “मी आता मागे लागणारच आहे. मी ज्या- ज्या वेळेस मागे लागतो, तेव्हा माणसाला टेकवितोच त्या शिवाय आपण गप नाही बसतं. आपण टेकविणार म्हणजे टेकविणार. त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीने घडवून आणलंय. त्याला आता सुट्टी नाही. आज माझ्या काही तपासण्या आहेत. उद्या सुट्टी घेतल्यानंतर मी अंतरवली सराटीत जाऊन दर्शन घेणार, त्यानंतर शहागंज अंकुशनगरला जाणार आहे. त्यामुळे मी आता बरोबर टप्याटप्याने मागे लागतोय” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, “बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात जाती- पाती ओबीसीची संबंध नाही. पाप करायचं, गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा खायचा. गोरगरीबांना मिळून द्यायच नाही, गोरगरीबांचा कैवारी असं बीड जिल्ह्याला दाखवायचं. आता जनतेचे डोळा उघडतील. बीडची जनता धनंजय मुंडेला माफ करणार नाही” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले की, “धनंजय संघटित गुन्हेगारी घडवून आणतो, त्यावर 302 दाखल करावा. तो सगळ्यांना सोबत घेऊन फिरतो. माझ्याकडे आला तेव्हा तो ( कराड ) सोबत होता, तो रोज सोबत आहे, त्याला माहित नाही का, हा गुन्हेगार आहे म्हणून धनंजयने गुन्हे करण्यासाठी टोळ्या तयार केल्या आहेत. सगळे गुन्हे या टोळ्या करतात. या लोकांना मुंडे वापरून घेतात. हे सगळे लोक सारखेच आहेत असं म्हणायची वेळ आली आहे. अंजली दमानिया यांनी सांगितलं ते शॉकिंग आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच रक्त नका पिऊ रे, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.