मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे अंधश्रद्धेतून आरोप केेले जात आहे (फोटो - नवराष्ट्र)
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीच्या शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला हा सध्या चर्चेत आला आहे. वर्षा निवासस्थानाचे राजकीय वर्तुळामध्ये मोठे महत्त्व आहे. मात्र विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून दोन महिने झाले तरी देखील देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर रहायला गेलेले नाही. यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. वर्षा बंगल्याबाबत अंधश्रद्धेचा उल्लेख खासदार राऊत यांनी केला आहे. वर्षा बंगल्यावर जादूटोणा झाला आहे, रेड्याची शिंगं पुरली आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जात नाहीत असा खळबळजनक दावा खासदार राऊत यांनी केला आहे. यावरुन आता शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून वर्षा निवासस्थानाबाबत विधान केले. त्यांच्या या विधानामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. खासदार राऊत म्हणाले की, संजय राऊत म्हणाले होते, “देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? त्यांचं कुटुंब का घाबरत आहे? वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला घाबरत आहेत? हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे. मी कुठेही म्हटलं नाही की तिथे लिंबू-मिरच्या असतील. ‘वर्षा’ हा सरकारने मुख्यमंत्र्यांना दिलेला अधिकृत बंगला आहे आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाहीत. तिथे नेमकं काय घडलंय? की याआधी तिथे असणाऱ्यांनी घडवलंय कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत,” असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरुन त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील नेत्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, त्यावेळी वर्षा बंगलामध्ये एक टोपलीभर लिंबं सापडली होती हे एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं आहे. असं वक्तव्य आता रामदास कदम यांनी केलं आहे. संजय राऊत आणि सामनाकडून एकनाथ शिंदे यांची सातत्याने बदनामी केली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टात जावं,’ असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रामदास कदम म्हणाले की, “एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी अमित शाह यांना अफझल खान म्हणायचं. हे यांचं धोरण. तसंच संजय शिरसाट यांनी जे मत मांडलं ते त्यांचं एकट्याचं मत असू शकतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र होण्याची काहीही शक्यता नाही. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना सांभाळली आहे. जर आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर असतो तर आमचे आमदारही निवडून आले नसते. एकनाथ शिंदेंनी ८० जागा लढवल्या आणि ६० आमदार निवडून आणून दाखवले ही बाब महत्त्वाची आहे. काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रिपद घेतलं की काय होतं हे उद्धव ठाकरेंना जनतेने दाखवून दिलं आहे,” अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.