
येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत 24 प्रभागांतील 95 नगरसेवकांच्या निवडीसाठी 8 लाख 19 हजार 161 मतदार मतदान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने व्यापक तयारी केली असून, शहरातील 958 मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पुरेसे मतदान कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे, कडेकोट पोलीस बंदोबस्त तसेच वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी यंदा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान दिनाच्या दिवशी महापालिकेच्या परिवहन सेवेने प्रवास करणाऱ्या मतदारांना 20 टक्के प्रवास सवलत देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे ठरणार आहे. याशिवाय शहरातील हॉटेल व उपहारगृह व्यावसायिकांशी चर्चा करून, त्यांच्या क्षमतेनुसार मतदारांना खाद्यपदार्थांवर सवलत देण्याची विनंती करण्यात आली होती.
या आवाहनाला व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच, मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि मतदानाबाबत सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने 20 हून अधिक मतदान केंद्रांवर सामाजिक जाणीव जपणाऱ्या विविध थीम्स राबवण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्त शर्मा यांनी दिली.महापालिकेच्या या उपक्रमांमुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.