
MLA Sanjay Shirsat held a press conference and targeted BJP and NCP political news
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. अंतर्गत राजकारणामुळे अनेक ठिकाणी युतीमध्ये वाद निर्माण झाला. महायुतीमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शिंदेंचे अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार गटात अलिखित करार झालाय. पक्षाचे लोक आपआपसात घ्यायचे नाही तरी संभाजी नगरात पैशांची मस्ती काहींना आली आहे. त्या जीवावर फोडाफोडी केली जात आहे. त्याबाबत अहवाल आम्ही एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. याचा परिणाम सगळ्यांना भोगावे लागेल, असा इशारा संजय शिरसाट यांनी भाजपवर साधला आहे.
पुढे संजय शिरसाट म्हणाले की, “वर्चस्व सिद्ध करायला आम्ही पाऊल उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नाका, संयम पाळला आहे. मात्र, जास्त काळ टिकणार नाही. संयमाची मर्यादा असते. फुलंब्री, गंगापूर, वैजापूर सगळीकडे असे सुरू असेल तर महायुती म्हणून काय आपला रोल आहे. हे थांबवा, याचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होईल. महायुतीमध्ये असे सुरू असले तर निवडणूक लढवता येणार नाही. एक लक्षात ठेवा अॅक्शनला रिअॅक्शन असेल. याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी. बरं प्रचार करायचा की फोडाफोडी करावी हे पण ठरवा,” असा देखील टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
पुण्यातून थंडी गायब! शहरातील तापमानात चढउतार; कोकणात पावसाचा अंदाज
भाजपच्या नेत्यांचा देखील संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उत्तर देतान शिरसाट म्हणाले की, ” लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश द्या असे होत नाही. बावनकुळेंला माहिती आहे ते सगळीकडे होते. असे प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लखलाभ. आम्ही भाजपाचे लोक घेत नाही मग त्यांनी फोडणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यांना अधिकार आहेत. मात्र, मुख्यमंत्री हे मोठे असतात. त्यांना सर्व अधिकार असतात आणि तिजोरी मालक कोणी असेना ठरवताना सगळे ठरवतात, विकासाच्या आड कोणी येऊ शकत नाही,” असे देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत.
जनतेच्या हातात कटोरा आहे का?
तसेच घराणेशाहीमध्ये उमेदवारी बाबत देखील त्यांनी मत मांडले. संजय शिरसाट म्हणाले की, “घराणेशाही लाट आलेली आहे, मान्य आहे. लोकशाहीत आत्मविश्वास असेल तर जनता तुम्हाला स्वीकारेल. कुणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही. मतदार याद्या बनवणे हा खेळ नाही. कुठलाही अधिकारी याद्या कशा असाव्यात असे विचारत नाही, असे शिरसाट म्हणाले आहेत. चाकणकर यांनी अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या असल्याचे विधान केले. याबाबत ते म्हणाले की, सगळे असे म्हणायला लागले तर चावी तुमच्याकडे आणि जनतेच्या हातात कटोरा आहे का? ते जनतेचे पैसे आहे. आपण वॉचमन आहोत लक्षात ठेवा,” असे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांना सुनावले आहे.