MNS and Shiv Sena Thackeray group Nashik united morcha bala Nandgaonkar Political News
Shivsena – MNS : नाशिक : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईसाठी मनसे पक्षाने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये वर्चस्व राखण्यासाठी मनसे व शिवसेना ठाकरे गटाची युती होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवतीर्थावर प्रमुख नेत्यांची भेट देखील झाली आहे. यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर हे नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाशिकमध्ये जाऊन मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त मोर्चामध्ये सहभागी झाले. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. या दौऱ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. बाळा नांदगावकर म्हणाले की, नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आमचा संयुक्त मोर्चा आहे. या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलयं त्या नाशिककडे मंत्रिमंडळाच किती लक्ष आहे? नाशिकमध्ये नेमकं काय चालू आहे? त्यासाठी हा संयुक्त मोर्चा शिवसेना उबाठा आणि मनसेने काढलेला आहे, असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बाळा नांदगावकर म्हणाले की, “नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, दिवसागणिक खून सत्र सुरू आहे. एमडी ड्रग्स टपऱ्यांवर विकले जात आहेत. शाळा, कॉलेजच्या आजुबाजूला ड्रग्स विकले जात असतील आणि सरकारच त्याकडे लक्ष नसेल तर सरकार म्हणून काय भूमिका घेणार? हनीट्रॅप प्रकरणाचं पुढे काय झालं? शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आदिवासी शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. नाशिकवर राज ठाकरेंचे अपार प्रेम आहे. मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेलं असलं तरी राज ठाकरेंच प्रेम कमी झालेलं नाही,” असा टोला देखील बाळा नांदगावकर यांनी नाशिककरांना लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे नाशिककरांना आवाहन करताना बाळा नांदगावकर म्हणाले की, “नाशिकचा विकास होत नाही, स्वतःला कर्तबगार समजणाऱ्या गिरीश महाजन काय करताय? छगन भुजबळ, दादा भुसे काय करत आहेत? सरकारला जाग आणण्यासाठी आजचा मोर्चा आहे. नाशिक दत्तक घेऊन काय केलं? नाशिककरांच्या तोंडाला पानं पुसली. नाशिकची लोकं तुम्हाला विचारत आहेत, सिंहस्थ कामाच काय झालं? प्रकल्प उद्ध्वस्त झाले. जबाबदार कोण? मुख्यमंत्री राज्याचे पालक असतात. नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली. राज ठाकरेंनी केलेली कामं तरी टिकवली का? आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे? लोकांनी आम्हाला नाकारलं ते ही चांगलं केलं, ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केलं? हे लोकांना कळलं,” असा सवाल बाळा नांदगावकर यांनी विचारला आहे.