MP Nilesh Lanke on maratha reservation protest on azad maidan by manoj jarange patil
Maratha Reservation : अहिल्यानगर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन सुरु केला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे सांगितले आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा दिला होता. यावर माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की, सरकारने आता लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. शरद पवार यांनी सुद्धा कार्यक्रमांमध्ये स्टेटमेंट केलं की तामिळनाडू सारखं ७२ टक्के आरक्षण या ठिकाणी केले पाहिजे. ओबीसींच्या ताटातून घेण्यापेक्षा केंद्र सरकारने नवीन केंद्र सरकारच्या अख्यारितेतला विषय असून त्या ठिकाणी आरक्षण वाढवून घेतलं पाहिजे. तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रामध्येही आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी अशी आमची भूमिका असल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत घोषणाबाजी केली. यादरम्यान मराठा आंदोलनादरम्यान काही मराठा समाजातील बांधवांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे वाटोळ शरद पवारांनी केले अशी टीका केली. यावर बोलताना खासदार लंके म्हणाले, “चांगली घटना घडत असताना काही विघ्न संतोषी लोक त्याला मुद्दामहून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. पहिल्या दिवशी आंदोलन सुरू झाले त्यावेळी खासदार बजरंग सोनवणे, भास्कर भगरे यांच्यासह मी देखील भेटलो आणि यामध्ये शरद पवारांची भूमिका देखील सकारात्मक आहे. पण काही लोकं वेगळी भूमिका आणि दृष्टिकोन घेऊन आंदोलनात सहभागी होत असतात कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचा यांच्याकडून प्रयत्न केला जात असतो त्याकडे जास्त लक्ष नाही दिले पाहिजे, असे मत निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
काही चुकीच्या प्रवृत्ती ही कृत्य करतात
त्याचबरोबर मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवला. तसेच खासदार सुळे यांनी जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट देखील घेतली. याबाबत खासदार निलेश लंके म्हणाले की, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा हेतू चांगला नसतो. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा असताना काही चुकीच्या प्रवृत्ती ही कृत्य करत असतात. जरांगे पाटील यांच्याकडून यावर कुठलेही व्यक्तव्य नाही आणि त्यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका बजावणारे सहकाऱ्यांनी याबाबत असे कृत्य होणार नाही, असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सामाजिक उपक्रमांमध्ये राजकारण आणू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की सामाजिक कार्यामध्ये राजकारण आणू नये असे म्हणत असतील तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे. राजकीय वक्तव्य करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं की या राज्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला निलेश लंकेंनी लगावला.