
MP Rahul Gandhi Bihar visit sabha Tejashwi Yadav for Bihar election 2025 campaign
Rahul Gandhi Bihar Viist: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बिहारची निवडणूक दोन टप्प्यामध्ये होणार असून राजकीय रंगत वाढली आहे. सर्व प्रमुख नेत्यांनी आपला मोर्चा बिहारकडे वळवला असून जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील बिहारच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. राहुल गांधी यांची दरभंगा आणि साकरा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
बिहारी जनतेला आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले की, , “आतापर्यंत तुम्हाला जे काही मिळाले आहे, मग ते मतदानाचा अधिकार असो, शिक्षण असो किंवा आरोग्य असो, ते संविधानामुळेच मिळाले आहे. पण नरेंद्र मोदी आणि आरएसएस संविधानावर हल्ला करत आहेत. जेव्हा ते मते चोरतात तेव्हा ते संविधानावर हल्ला करतात. जेव्हा ते एखाद्या संस्थेला कमकुवत करतात किंवा आरएसएसशी संबंधित एखाद्या व्यक्तीला कुलगुरू म्हणून नियुक्त करतात तेव्हा ते संविधानावर हल्ला करतात. मी स्पष्टपणे सांगतो: आम्ही संविधानाचे रक्षण करू आणि कोणीही ते नष्ट करू शकत नाही.” असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राहुल गांधी म्हणाले की, “मी देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला बिहारमधील कष्टाळू तरुण काम करताना दिसतात. त्यांनी दिल्ली बांधली, बेंगळुरूचे रस्ते बांधले आणि गुजरात आणि मुंबईच्या विकासात मोठे योगदान दिले. दुबईसारखी ठिकाणेही त्यांच्या मेहनतीने बांधली गेली. मग प्रश्न असा आहे की: जर बिहारचे लोक संपूर्ण देश आणि जग बांधू शकतात, तर ते स्वतःचा बिहार का बांधू शकत नाहीत? नितीश कुमार गेल्या २० वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वतःला अत्यंत मागासलेले म्हणतात, पण शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात त्यांनी काय सुधारणा केल्या आहेत? तुम्हाला असा बिहार हवा आहे का जिथे तुम्हाला स्वतःच्या राज्यात काहीही मिळणार नाही?” असे प्रश्न उपस्थितीत करत राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर घणाघात केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जहरी टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, “छठ पूजेसाठी भाविक दिल्लीतील प्रदूषित यमुनेत प्रार्थना करत होते, तर पंतप्रधानांनी खास त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष तलावात डुबकी मारली.नरेंद्र मोदी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये स्नान केले. त्यांचा यमुनेशी काहीही संबंध नाही. त्यांचा छठ पूजेशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत. नीतीशजींचा चेहरा वापरला जात आहे. पण, रिमोट कंट्रोल भाजपाच्या हातात आहे. तुम्ही असा विचार करू नका की ते सर्वात मागासलेल्या लोकांचा आवाज ऐकतात, जर तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले, तर ते व्यासपीठावर नाचतील”, असा घणाघात खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील प्रचार सभेमध्ये केला.