
MP Sanjay Raut and CM Devendra Fadnavis bet of 11 lakhs regarding the BMC elections
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, हिंदू-मुसलमान किंवा भारत-पाकिस्तान या विषयांचा आधार न घेता भाजपने एखादी निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांना १ लाख रुपये देईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून म्हटले होते. तसेच विकासावर एक तरी भाषण दाखवा अशी पैज मुख्यमंत्री फडणवीसांनी लावली होती. याचा अहवाला देऊन खासदार राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला.
हे देखील वाचा : लाडक्या बहिणी’पासून पर्यावरण प्राधिकरणापर्यंत; महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार
या संदर्भात भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंचे १ लाख आणि त्यात माझे १० लाख रुपये मिळवून मी ११ लाख रुपये द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस हे जर स्वतःला शूर आणि महान समजत असतील, तर त्यांनी हे चॅलेंज स्वीकारावे आणि हिंदू-मुस्लिम वादाशिवाय निवडणूक लढवून दाखवावी.”असे खुले आव्हान खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी आणि कचरा यांसारख्या नागरी सुविधांवर चर्चा व्हायला हवी. मात्र, भाजप तिथेही अयोध्या, जय श्री राम आणि बाबरी मशीद असे धार्मिक मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करत आहे. आज जी मुंबई तुम्हाला दिसतेय, त्यात ५६ पेक्षा जास्त उड्डाणपूल आणि मोठे प्रकल्प हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून उभे राहिले आहेत. तेव्हा भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ तुम्हीही आमच्या सोबतच होता. जे काम शिवसेनेने केले आहे, त्याचे श्रेय चोरू नका,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप
पुढे संजय राऊत यांनी मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “आमची संपूर्ण हयात मुंबईत मराठी माणसाचे हक्क टिकवण्यात गेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर उभे राहिलेच आहे, पण मराठी माणसाला ताठ मानेने जगता येणे, हाच खरा विकास आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि जबाबदार नेते आहात. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने खोटे बोलणे तुम्हाला शोभत नाही. जे पक्षनिधीसाठी हवे असतील तर हे ११ लाख रुपये तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता, पण आधी धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा,” असे चॅलेंज संजय राऊतांनी दिले.