मात्र या सभेनंतर शिंदेसेना नेते व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. विशेषतः पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजप आमदार नरेंद्र मेहता हेच कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
सरनाईक म्हणाले की, याआधी भवन उभारणीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मेहता यांनी आपल्यावर टीका केली होती. मात्र काल झालेल्या सभेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून समाज भवन उभारण्याची घोषणा केली. यावरून आपण पूर्वी केलेल्या कामाचीच पोचपावती मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “मुख्यमंत्र्यांनी माझं नाव न घेता व्यासपीठावरून ज्या घोषणा केल्या, त्या माझ्या प्रयत्नांचीच दखल असल्याचे स्पष्ट होते. एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे,” असेही सरनाईक यांनी नमूद केले.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, पाणी आणि मेट्रोसारख्या महत्त्वाच्या विकासकामांवरून सत्ताधारी पक्षांतर्गत संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. ऐन निवडणुकीच्या रणसंग्रामात होणारे आरोप प्रत्यारोपांमुळे मिरा भाईंदरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याचं दिसून येत आहे.






