
MP Sanjay Raut Press Confernce target Mahayuti government political news
Sanjay Raut News : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगल्या आहेत. 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जोरदार प्रचाराचा धुराळा उडाला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र मुलाखत पार पडली आहे. खासदार राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली जात आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित मुलाखतीवर भाजपने निशाणा साधला आहे. याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. याबाबत ते म्हणाले की, ‘दोन धुरंदर नेते एकत्र आल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे चुकीचे काय बोलले? भारतीय जनता पक्षाचा सध्याचा डोलारा हा मोदींच्या करंगळीवर उभा आहे. मोदी आज आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत राजकारणात डगमगत आहेत. त्यामुळे हा डोलारा एका करंगळीवर तोलला गेला आहे. राज ठाकरे म्हणतात, हा डोलारा कधीही कोसळू शकतो आणि ते कोसळणे देशाची जनता पाहत आहे. या डोलाऱ्याला भक्कम आधार नाही. भक्कम आधार असता तर एआयएमआयएमसोबत युती झाली नसती, काँग्रेससोबत युती झाली नसती,” असा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
‘ब्रँड ठाकरे’ वरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “त्यांनी ब्रँडची ‘ब्रँडी’ प्यायलेली आहे. पण ती शाकाहारी ब्रँडी आहे, गुजराती ब्रँडी आहे. त्यामुळे त्यांना चढणार नाही. प्रश्न असा आहे की शिवसेनाप्रमुखांनंतर कोणता ब्रँड ठरवणार? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने निवडणुका लढलो आणि त्या जिंकल्या. तुम्हीही आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाला होतो. बाळासाहेब ठाकरे जसे ब्रँड होते, तसेच आज मोदी ब्रँड असल्याचे तुम्ही म्हणता. पण उद्या मोदी नसतील तेव्हा काय करणार? अमरपट्टा घेऊन कोणी येणार आहे का? मग कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार?” असा खोचक सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनाप्रमुखांवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही
“शिवसेनाप्रमुख हे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील ब्रँड आहेत, जसे महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भूतकाळाऐवजी वर्तमानावर बोलावे. ज्या शिवसेनाप्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडला, ज्यांचे चिन्ह चोरून दुसऱ्याला दिले, त्या शिवसेनाप्रमुखांवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही,” असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.
ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देण्यापेक्षा महाराष्ट्रात पाहा
त्याचबरोबर मतदानावर देखील खासदार राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मतदान कोणी रोखत नाही असे म्हणता, पण प्रत्यक्षात मतदार यादीतून नावे वगळून, एसआरसारख्या योजनांद्वारे दहशत निर्माण केली जाते. निवडणूक आयोगाने पक्ष फोडण्यास मदत करून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण केला. जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांना मतदान करू दिले जात नाही. ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देण्यापेक्षा महाराष्ट्रात पाहा नागपूर, मुंबईत पाहा,” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मशाल आणि इंजिन याशिवाय पर्याय नाही
अनेक उमेदवारांची निवड ही बिनविरोध होत आहेत. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काही निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, त्या सहमतीने झाल्या होत्या. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरेंद्र मोदी, अमित शहा कोणीही बिनविरोध निवडून आलेले नाहीत. तसेच पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द झाला आहे. याबाबत राऊत म्हणाले की, मुंबईचा वारा बदललेला आहे. कोणीही आला तरी त्यांची टोपी उडेल. मोदीजी, योगीजी, मध्यप्रदेश-राजस्थानचे मुख्यमंत्री – सगळे मुंबईत येऊन पाहू द्या. मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकत राहील. मशाल आणि इंजिन याशिवाय पर्याय नाही,” असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.