mp sanjay raut reaction on raj thackeray and uddhav Thackeray alliance in mumbai elections 2025
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी वाद निर्माण झाला आहे. मराठी भाषेसाठी आणि अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले आहेत. यामुळे मराठी माणूस सुखावला आहे तर मुंबई अजूनही मराठी माणसांची असल्याचे अधोरेखित झाले आहे. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे मराठी मतांचे एकत्रिकरण होण्याची शक्यता आहे. लवकरच मुंबई महापालिकेसह राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या एकीचा फायदा ठाकरे बंधू करुन घेणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांना ठाकरे बंधू यांच्या राजकीय भविष्य़ाबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “पाच तारखेला जो मराठी भाषेचा विजयी उत्सव जो झाला ज्याला आपण विजयाचा हँगओव्हर बोलतो तो अद्याप उतरलेला नाही. लोकं आजही त्या भव्य विजयी मेळाव्याची चर्चा करत आहेत. आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पहालं, तर सगळ्यांच्या लक्षात येईल ही महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेले वीस वर्ष वाट पाहत होती आणि तो क्षण आल्यावर लोकांच्या अपेक्षा खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत. मग उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची भूमिका झाली असली तरी योग्यवेळी योग्य गोष्टी घडत असता,” असे सूचक विधान खासदार राऊत यांनी केले आहे.
राजकीय बातम्य़ा वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “जसं भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे गटाचे लोक सांगत होते की, हे शक्यच नाही आहे एकत्र एका मंचावर येणार. आताही ते म्हणत आहेत की, युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो. आवाहन जे आहे ते परप्रांतीयांकडून नाही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होत आहे तर भीती आणि आव्हान या महाराष्ट्रातल्या अंतर्गत शक्तींकडून आहे. कसे येतात ते पाहतो, म्हणजे तुम्ही ठाकरे यांना कंट्रोल करत आहात का? तुम्ही ठाकरे यांच्या वरती स्वतःचा दबाव आणू पाहताय काय? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांनी खासदार राऊत यांना ठाकरे बंधूंच्या राजकीय भविष्यांबाबत सवाल विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, “राजकीय निर्णय कधी होईल? होईल ना… मला पूर्ण खात्री आहे. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल. हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः राज ठाकरे यांना विचारायला हवा. कार्यकर्त्यांचा उत्साह मी दोन्ही बाजूने पाहत आहे. एकत्र काम करत आहेत, एकत्र आंदोलन करत आहेत, एकत्र संघर्ष करत आहेत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत. हे चित्र महाराष्ट्रात फार दुर्मिळ होतं कालपर्यंत आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करु नये,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.