MP Sanjay Raut target eknath shinde group over second Shivsena Dussehra Melava maharashtra political news
Shivsena Dussehra Melava : मुंबई : दसरा जवळ येऊ लागताच राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण येते. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागतात. शिवसेनेचा दसरा मेळावा हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. खासदार राऊत यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना जोरदार निशाणा साधला.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटावर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “दसऱ्याला दोनच मेळावे महत्वाचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. इतर मेळाव्याला तुम्ही दसरा मेळावा म्हणत असाल, तर हा तुमचा प्रश्न आहे. या दोन्ही मेळाव्यांकडे देशातील जनतेच लक्ष लागलेलं असतं, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, “चोर बाजारात माल विकायला असतो, दिल्लीतही चोर बाजार आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे, तिथे त्यांनी राजकारणातला चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्याला जनता शिवसेना मानत नाही. एक निवडणूक आयोग आणि भाजप सोडले तर दुसरे लोक त्यांना शिवसेना मानत नाही. आतून मानावं लागतं” अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.
दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत असतो. मात्र दोन शिवसेना झाल्यानंतर हे मैदान घेण्यावरुन वादंग निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, प्रचंड पैशांचा वापर करुन लोक आणले जातील. अरे तुम्ही कोण? तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही महाराष्ट्राला काय विचार दिला? हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा तुम्ही कुठे होता?. कुठल्या गोधडीत मुतत होता?. जर कोणाला वाटत असेल की, आम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर जन्माचे दाखले घेऊन या. एक आरएसएस आणि दुसरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होणारा मेळावा हे सोडले, तर बाकीचे मेळावे होत असतात” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना पावसाळ्यातील गांडूळ म्हणून हिणवले. ते म्हणाले की, “सध्या एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजतात. सकाळी उठताना बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब सामान्यांचे पुढारी होते. बाळासाहेबांनी कधीच दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, भूमिका अर्पण केल्या नाहीत. निर्णय कुठले घ्यायचे म्हणून कधीच नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या दारात उभे राहत नव्हते. एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. शिंदेंच्या पक्षाला मी पक्ष मानत नाही, पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात, पावसाळा संपला की नष्ट होतात तसे नरेंद्र मोदी, अमित शाह असेपर्यंत हे गांडूळ असतील, नंतर पावसाळ्यातील गांडूळाप्रमाणे नष्ट होतील. देशाच्या राजकारणात केलेली ही तात्पुरती व्यवस्था आहे. एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अपर्ण करत राहतील, तो पर्यंत ते राहतील”अशी आक्रमक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.