Ncp jitendra awhad target mahayuti over ed office fire and pahalgam terror attack
ठाणे : मुंबईमधील ईडीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि.27) पहाटे दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात भीषण आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. ईडीचे कार्यालय कैसर-ए-हिंद इमारतीत आहे. आगीमध्ये कोणतेही कागदपत्रांचे नुकसान झालेले नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र विरोधकांनी यावरुन टीकेचे रान पेटवले आहे. शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही आग नैसर्गिक होती की मानवनिर्मित होती असा संशय व्यक्त केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसला आग लागल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका कली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ईडीच्या ऑफिसमध्ये ही आग लागली आहे की, लावण्यात आली आहे, हा संशय जनतेच्या मनात येणारच आहे. आणि हे परमेश्वराला माहीत. एकदा मंत्रालयात आग लागली होती, तेव्हा ती नैसर्गिक होती. तेव्हा विरोधात असणाऱ्या आणि आत्ता सत्तेत असणारे ओरडत होते, आग लावली आग लावली आता ती आग उलटी फिरली,” असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मंत्रालयामध्ये एकदा आग लागली होती त्यावेळी ती शॉर्टसर्किटने लागली होती. मात्र मंत्रालयातली आग जणू काही त्यावेळचे मुख्यमंत्री यांनी स्वतः जाऊन लावले, असे त्या वेळेसचे विरोधी पक्षाचे म्हणजेच आत्ताचे सत्ताधारी म्हणत होते. कुंभमेळ्यात डुबकी मारली तर, सगळे पाप नष्ट होतात, त्या सारखंच आहे. ईडीकडे महत्त्वाचेच पुरावे असतात. ७० हजार कोटींच्या फाईल जाळल्या म्हणून, तुम्ही म्हणत होते. त्याच ७० हजार कोटींच्या फायली ईडी कार्यालयात होत्या,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
पाकिस्तानी नागरिक राज्याबाहेर काढले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबाबत आव्हाड म्हणाले की, “जो प्रचलित कायदा असेल, त्याच्यानुसार कारवाई करावी, त्यांना कोण नाही म्हणत आहे. पण दर वेळेस आम्ही पाकिस्तान्यांना पकडतो आहे. मग यांचे बगलबच्चे कुठल्यातरी भागात जाणार आणि पाकिस्तानात शोधत बसणार आणि नाटक करत बसणार. आपलं राजकारण करत असताना विकासावर बोलायचं नाही. उपाशी मेलो तरी चालेल, पण पाकिस्तान्यांना मारू म्हणा,” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महायुतीकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असे आश्वासन निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिले होते. मात्र असे कोणतेही वक्तव्य नेत्यांनी केले नसल्याचे अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केले. यावरुन जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “इतकी खोटारडी माणस सत्तेत आली आहेत, की ज्या लाडक्या बहिणींमुळे हे सत्तेत आले आहेत, त्यांचा विसर या भावांना पडलेला आहे. इतके खोटारडे भाऊ जगात कुठे नसतील,” असा टोला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.