ncp manikrao kokate bjp girish mahajan target chhagan bhujbal after Ministeral post
नाशिक : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये ‘लेट’ पण थेट ‘एन्ट्री’ झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन केल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सहा महिन्यांनंतर भुजबळ यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर महायुतीमधील नेत्यांनीच त्यांच्याविरोधात आवाज उठवला आहे.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व पक्षश्रेष्ठींचे धन्यवाद मानले होते. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचे घोंगडे अजून भिजत आहे. यामध्ये भुजबळांच्या मंत्रिपदामुळे ही लढाई तिरंगी झाली आहे. यामुळे भाजप नेते गिरीष महाजन आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याच पक्षातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय ते पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू, असा उपरोधिक टोला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला आहे. यामुळे भुजबळ यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेते टीका करत आहेत.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज (दि.26) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, रोहित पवार यांच्या टीकेकडे जास्त लक्ष देत नाही. मी पूर्वी पासूनच कोट घालतो. शेतकऱ्यांचे राहणीमान व आर्थिक परिस्थिती सुधारावी, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी कोट घालावा असं मला वाटते. रोहित पवारांना देखील कोट घालायला देऊ, असा टोला माणिकराव कोकाटे यांनी लगावला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की, नाही हे माहित नाही. वरिष्ठचं याबाबत निर्णय घेतील. सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा नसल्याचे देखील कोकाटे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर छगन भुजबळ हे तीसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे विधान केले होते. त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांनीही छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला लगावला. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महायुतीचे नेते टीकास्त्र साधत असल्याचे दिसून आले आहे.